महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाप्रकरणी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यावर आज ब्रिजभूषण शरण सिंह दिल्लीच्या राऊस अव्हेन्यु न्यायालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आपण दोषी नसल्याचं म्हटलं आहे. “चूक केलीच नाही तर ती मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही”, अशी प्रतिक्रिया ब्रिजभूषण सिंह यांनी दिली.
दिल्ली न्यायालयाने ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळ, महिलांचे ब्लॅकमेलिंग असे आरोप न्यायालयाने निश्चिती केले आहेत. त्यामुळे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, ब्रिजभूषण सिंह यांनी न्यायाधीश प्रियांका राजपूत यांच्यासमोर आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. ‘मी काही गुन्हा केला नाही तर गुन्ह्यांची कबुली कशी देऊ’, असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “आयेगा तो मोदी ही”, पण भाजपा किती जागा जिंकणार? राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणाले…
आता महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर औपचारिकपणे आरोप निश्चित केले आहेत. न्यायालयाने सात कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणात सहआरोपी असलेल्या सचिन तोमर यांच्याविरोधातही आरोप निश्चिती करण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर या प्रकरणाचा खटला चालणार आहे.
ब्रिजभूषण सिंह यांनी या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलं, माझ्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, जे आरोप माझ्यावर त्यांनी केले आहेत. त्यांना ते आरोप न्यायालयात सिद्ध करावे लागणार आहेत. पण माझ्याकडे मी निर्दोष असल्याचे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकरण खोटं आहे. त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध कुठलेही पुरावे नाहीत. जर असतील तर त्यांनी ते सिद्ध करावे”, असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
लैंगिक अत्याचाराविरोधात कुस्तीपटूंचं आंदोलन
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर दिल्लीत मोठं आंदोलन केलं होतं. देशपातळीवरील कुस्तीपटू या आंदोलनात उतरले होते. मात्र, ब्रिजभूषण यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर या आंदोलानाची व्याप्ती वाढल्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांचं कुस्ती संघटनेचं अध्यक्षपद काढून घेण्यात आलं होतं.
ब्रिजभूषण सिंह यांना उमेदवारी नाकारली
महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढल्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता.