भारतीय सैन्याने अफ्स्पा कायद्याचा (AFSPA) दुरुपयोग करून ३ मुजरांची हत्या करणाऱ्या कॅप्टन भूपेंद्र सिंहवर कोर्ट मार्शलची कारवाई सुरू केली आहे. २०२० मध्ये आरोपी कॅप्टन भूपेंद्र सिंहने दक्षिण जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात राजौरी येथे बनावट चकमक केली होती. तसेच मारले गेलेले लोक दहशतवादी असल्याचा दावा केला. मात्र, स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर या प्रकरणी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ बसवण्यात आली. दुसरीकडे जम्मू काश्मीर पोलिसांनी देखील स्वतंत्र एसआयटीची स्थापना करून तपास केला. यात ही चकमक बनावट असल्याचं उघड झालं.

कॅप्टन भूपेंद्र सिंहवर दहशतवादविरोधी कारवाईसाठी अफ्स्पा कायद्यांतर्गत दिलेल्या अतिरिक्त अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आरोपीने केलेल्या बनावट चकमकीत इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि मोहम्मद अबरार या ३ मजुरांची हत्या करण्यात आली होती. २ वर्षांपूर्वी १८ जुलैला आमशिपोरा गावात ही बनावट चकमक घडवून आणण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कट्टरतावादविरोधी कारवायांमध्ये नैतिक वर्तनाचे सर्वोच्च निकषांचं पालन करत कॅप्टन भुपेंद्र सिंह याच्याविरोधात कोर्ट मार्शलची कारवाई सुरू करण्यात आली आहे. कॅप्टन भुपेंद्र सिंहने अफ्स्पा अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करणे, सर्वोच्च न्यायालयाने सैन्यासाठी मंजूर केलेल्या नियमांचा भंग करणे या कारणांसाठी ही कारवाई करण्यात येत आहे.”

पोलिसांच्या एसआयटी चौकशीत काय समोर आलं?

कॅप्टन भुपेंद्र सिंहने दोन नागरिकांच्या मदतीने चकमक झाली त्या ठिकाणी झोपडीला आग लावली. तसेच ही चकमक बनावट आहे हे सिद्ध करू शकणारे पुरावे नष्ट केले. ही बनावट चकमक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर मिळणाऱ्या बक्षिसांसाठी केल्याचं एसआयटीने म्हटलं. एसआयटीच्या आरोपपत्रात ७५ साक्षीदारांनी साक्ष दिली आहे. याशिवाय फॉरेन्सिक रिपोर्ट आणि आरोपीचे कॉल रेकॉर्ड याआधारे बनावट चकमकीचा पर्दाफाश करण्यात आला.

Story img Loader