Jagdish Tytler : काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर १९८४ च्या शीख दंगलप्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हे प्रकरण गुरुद्वारा पुल बंगश जवळ तीन शीख व्यक्तींची हत्या आणि १९८४ मध्ये धार्मिक दंगल प्रकरणाशी संबंधित आहे. जगदीश टायटलर यांच्याविरोधात १९८४ च्या शीख दंगल प्रकरणामध्ये खून, दंगल आणि हत्येला प्रोत्साहन देण्याच्या आरोपासंदर्भात खटला चालवण्यासाठी सबळ पुरावे असल्याचं न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पुल बंगश भागात उसळलेल्या दंगलीमध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. ही घटना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर घडली होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ सप्टेंबरला होणार आहे. यावेळी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने जगदीश टायटलर यांच्याविरोधात भादंवि कलम ३०२, १४७, १०९ अनुक्रमे खून, दंगल आणि गुन्ह्यास प्रवृत्त करणे यासह इतर कलमान्वये आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : Assam Jumma Break : नमाज पठणासाठी दर शुक्रवारी मिळणारी २ तासांची सुट्टी बंद; आसाम सरकारचा मोठा निर्णय

दरम्यान, सीबीआयने नोव्हेंबर २००५ मध्ये नवीन गुन्हा नोंदवण्यात आला होता. ट्रायल कोर्टाने गेल्या वर्षी २६ जुलै रोजी या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत जगदीश टायटलर यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, त्यानंतर जगदीश टायटलर यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये न्यायालयाने टायटलरला यांना या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. जगदीश टायटलर हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. शीख दंगलप्रकरणात सीबीआयने टायटलर यांना यापूर्वी तीनदा क्लीन चिट दिली होती. मात्र, न्यायालयाने ती क्लीन चिट फेटाळून लावत पुन्हा चौकशीचे आदेश दिले होते.

आरोपपत्रात काय म्हटलं होतं?

सीबीआयने सहा साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे जगदीश टायटलर यांच्या विरोधातील दाखल गुन्ह्याप्रकरणी उपस्थितीची पुष्टी केली. त्यापैकी चार साक्षीदारांनी त्यांना जमाव भडकावताना पाहिले होते. सीबीआयने मे २०२३ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात टायटलर यांच्यावर नोव्हेंबर १९८४ रोजी पुल बंगश गुरुद्वाराजवळ जमलेल्या जमावाला दंगल घडवून आणल्याचा आणि भडकावल्याचाही आरोप केला होता. दरम्यान, या आरोपपत्रात गुरुद्वारासमोर एका कारमधून उतरून जमावाला भडकावल्याचा आरोप एका साक्षीदाराने जगदीश टायटलर यांच्याविरोधात केला असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे.

जगदीश टायटलर कोण आहेत?

जगदीश टायटलर हे काँग्रेसचे नेते आहेत. ते २००४ मध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. पण त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court order to file a case against congress leader jagdish tytler marathi news gkt