येथील पुनालुर जिल्ह्य़ात एकाच गाईवर दोन महिलांनी आपला दावा सांगितल्यामुळे उद्भवलेला वाद सोडवण्यासाठी शेवटी न्यायालयाने गाईची डीएनए चाचणी करण्याचा आदेश दिला आहे.
गीता नावाच्या महिलेने दावा केला की, तिने आपली गाय आणि तिचे वासरू घराजवळील जंगलात चरण्यासाठी सोडले होते. मात्र परत न आल्यामुळे गीताने गाईचा शोध सुरू केला असता गाय आणि वासरू शेजारील गावातील शशिलेखा नावाच्या महिलेच्या अंगणात बांधून ठेवल्याचे आढळून आले. गीताने गाय आणि वासराची मागणी केली असता शशिलेखाने त्यांना परत करण्यास नकार दिला. अखेर वादावादीतून गायीच्या मालकी हक्काचे प्रकरण स्थानिक पोलीस ठाण्यात गेले. पोलीसही हा तिढा सोडवू न शकल्यामुळे अखेर हा वाद न्यायालयात गेला. मात्र तेथेही गाय आणि तिच्या वासराच्या मूळ मालकिणीची ओळख न पटल्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी प्रथम सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती संतोष दास यांनी गाईची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार गाईला येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात सोमवारी नेण्यात आले. तेथे तिच्या रक्ताचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच ते डीएनए या खटल्यातील एका महिलेकडे असणाऱ्या गाईशी जुळवून पाहण्यात येणार आहेत.

Story img Loader