भाजपला प्रस्तावित जाहीर सभा आणि रथयात्रा काढण्याची अनुमती द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पश्चिम बंगाल सरकारला दिला.
प्रस्तावित रथयात्रेचे फेरवेळापत्रक संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावे आणि आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घ्याव्या, असा आदेश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने प्रदेश भाजपला दिला.
घटनेने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचा विचार करून पश्चिम बंगाल सरकारने रथयात्रेच्या फेरवेळापत्रकाचा विचार करावा, असेही पीठाने स्पष्ट केले आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची राज्य सरकारने व्यक्त केलेली भीती निराधार नाही, मात्र भाजपने त्याबाबत आवश्यक ती पावले उचलावीत, असेही पीठाने म्हटले आहे.
जुने मतभेद विसरून आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा – मायावती
लखनऊ : सपा आणि बसपाच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरावे आणि आघाडीचे सर्व उमेदवार कसे विजयी होतील याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन बसपाच्या नेत्या मायावती यांनी मंगळवारी येथे केले.आघाडीच्या उमेदवारांचा विजय हीच आपली वाढदिवसाची भेट असेल, असेही त्या म्हणाल्या. सपा आणि बसपाने लोकसभेच्या प्रत्येकी ३८ जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी छोटय़ा पक्षांना प्रत्येकी दोन जागा सोडल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघ आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा राय बरेली मतदारसंघ येथून सपा-बसपा निवडणूक लढणार नाही. सपा-बसपाच्या आघाडीतून काँग्रेसला वगळण्यात आले आहे.
आपत्कालीन मदत निधी गैरवापर लोकायुक्तांकडून तक्रार दाखल
तिरुवनंतपुरम : केरळच्या लोकायुक्तांनी मुख्यमंत्री आपत्कालीन मदत निधीमध्ये झालेल्या गैरवापराबाबतची तक्रार दाखल करून घेतली असून त्याबद्दल मुख्यमंत्री पी. विजयन आणि राज्यातील अन्य मंत्र्यांवर नोटिसा बजावल्या आहेत. लोकायुक्त न्या. पी. सी. कुरिआकोसे आणि उपलोकायुक्त न्या. के. पी. बालचंद्रन व न्या. ए. के. बशीर यांच्या पूर्णपीठाने आर. एस. शशीकुमार यांनी केलेली तक्रार दाखल करून घेण्याचा मंगळवारी निर्णय घेतला. आपत्कालीन मदत निधीतून करण्यात आलेल्या वाटपाबाबतची चौकशी करण्याचे अधिकार संस्थेला आहेत का, यावरून लोकायुक्त आणि एक उपलोकायुक्त यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर पीठाची स्थापना करण्यात आली.