अभिनेते अनुपम खेर यांच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहारमधील न्यायालयाने दिले आहेत. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून काही मोठ्या लोकांची बदनामी केली जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. आज मंगळवारी मुझफ्फरपूर कोर्टात न्यायाधीशांनी अनुपम खेर यांच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने चित्रपटावर आक्षेप घेतला असून यामधून गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.

(आणखी वाचा : The Accidental Prime Minister: दिग्दर्शकावर इंग्लंडमध्येही करघोटाळ्याचा आरोप)

 काय म्हटले होते तक्रारीत –
सुधीर ओझा यांनी आपल्या याचिकेत केलेल्या तक्रारीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांची भूमिका निभावत अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. यामुळे मला आणि अनेकांना वाईट वाटलं असल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. तक्रारीत त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वड्रा यांच्याही प्रतिमेला धक्का लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधातही तक्रार करण्यात आली आहे.

 

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काही काळ त्यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारू यांनी लिहीलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे.

Story img Loader