पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना देश सोडून जाण्याची परवानगी पाकिस्तानी न्यायालयाने नाकारली आहे. मात्र, त्यांना उपचारासाठी परदेशात जाण्यास बंदी घालण्यात यावी, याबाबत दाखल केलेली याचिका मात्र फेटाळली आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शौकत अझीज यांनी असे सांगितले की, मुशर्रफ यांना जामीन देण्याचे काम न्यायालयाचे होते ते आम्ही केले, त्यामागील हेतू त्यांना न्यायालयात उपस्थित राहता यावे हा होता. मुशर्रफ हे सत्तर वर्षे वयाचे असून त्यांना अलिकडेच ह्दयविकाराचा झटका आला. नंतर लष्कराच्या रावळपिंडी येथील लष्करी रूग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. काही नमुने तपासणीसाठी ब्रिटनलाही पाठवण्यात आले होते.मुशर्रफ यांना लोकांचा पाठिंबा नसतानाही लष्कराचा मात्र त्यांना पाठिंबा असून मुशर्रफ यांना केव्हाही परदेशात हलवले जाऊ शकते, अशी चर्चा पाकिस्तानमध्ये आहे.
न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुशर्रफ देश सोडून जाऊ शकत नाहीत असे सांगून न्यायालयाने म्हटले आहे की, मुशर्रफ यांच्यावरील राजद्रोहाच्या आरोपाबाबत नेमण्यात आलेल्या विशेष न्यायालयाच्या कार्यकक्षेत आम्ही दखल देऊ इच्छित नाही.
लाल मस्जिद येथील सुहादा फौउंडेशन पाकिस्तान ट्रस्ट या संस्थेने ३ जानेवारीला मुशर्रफ हे पाकिस्तानातच रहावेत, त्यांना देश सोडून जाण्याची परवानगी देऊ नये, यासाठी याचिका दाखल केली होती. २००७ मध्ये जे लोक इस्लामाबाद येथील बंडाच्या कारवाईत मारले गेले होते त्यांच्या वतीने काम करणाऱ्या या संस्थेने मुशर्रफ पाकिस्तानातच रहावेत असे प्रयत्न ठेवले आहेत.

Story img Loader