अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन (Ronald Reagan) यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची विनाअट सुटका करण्यात आलीय. जॉन हिंकले असं या आरोपीचं नाव आहे. त्याने ४० वर्षांपूर्वी म्हणजेच ३० मार्च १९८० रोजी वॉशिंग्टनमधील हॉटेलबाहेर रेगन यांच्यावर हल्ला केला होता. मात्र, आता ६० वर्षीय जॉनला या प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यात आलंय.
रोनाल्ड रेगनवर हल्ल्याचं कारण काय?
आरोपी जॉनने अमेरिकन अभिनेत्री जॉडी फॉस्टरला (actress Jodie Foster) प्रभावित करण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं. त्याने अभिनेत्री जॉडी फॉस्टरचा टॅक्सी ड्रायव्हर हा चित्रपट पाहिला आणि तो पाहून तो तिच्या प्रेमात वेडा झाला. यानंतर त्याने जॉडीला प्रभावित करण्यासाठी थेट तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर गोळ्या झाडत हल्ला केला. हिल्टन हॉटेल बाहेर झालेल्या या बेछुट गोळीबारात रेगन यांच्यासह सचिव जेम्स ब्रँडी, पोलीस अधिकारी आणि गुप्तचर विभागाचा अधिकारी जखमी झाले होते.
२०१६ मध्ये आरोपी जॉन हिंकलेची अटीशर्तींवर सुटका
दरम्यान यापूर्वी आरोपी जॉनला हल्ल्यानंतर तात्काळ वॉशिंग्टनच्या मानसोपचार रुग्णालयात ठेवण्यात आले होते. २०१६ मध्ये त्याला अनेक अटीशर्तींसह तेथून सोडण्यात आले. यात आईच्या घरापासून ८० किलोमीटर परिसराबाहेर न जाणे, अमेरिकेचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, काँग्रेस सदस्य राहत असलेल्या कोणत्याही परिसरात न जाणे या अटींचा समावेश होता.
आता न्यायालयाने न्याय विभाग आणि आरोपी हिंकले यांच्यातील एका कराराला मंजुरी दिलीय. यानुसार हिंकलेची जून २०२२ मध्ये विनाअट सुटका करण्यात येणार आहे.
द रोनाल्ड रेगन प्रेसिडेंशियल फाऊंडेशनने या निर्णयाला विरोध केलाय. हा निर्णय ऐकून दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलंय. याशिवाय आरोपी जॉन हिंकले अजूनही इतरांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या सुटकेचा विरोध करतो, अशी भूमिका त्यांनी घेतली.