दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी राऊस अॅवेन्यू कोर्टाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल आता १५ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना आज (१ एप्रिल) न्यायालयासमोर हजर केलं. आजच्या सुनावणीवेळी ईडीने न्यायालयाकडे केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू हे ईडीकडून न्यायालयासमोर हजर होते. त्यांनी न्यायालयाकडे केजरीवाल यांच्या १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. कारण केजरीवालांनी चौकशीत कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. त्यांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर ‘मला माहिती नाही’ एवढंच उत्तर दिलं.
एस. व्ही. राजू म्हणाले, केजरीवाल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या फोनचा पासवर्ड सांगण्यास नकार दिला. त्यांनी इतर कुठल्याही डिजीटल डिव्हाईसचे पासवर्ड दिले नाहीत. ते कुठल्याही प्रश्नाचं योग्य उत्तर देत नाहीयेत. ते केवळ उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तर त्यावर ते मैं नहीं जानता (मला माहिती नाही) एवढचं उत्तर देतायत.
हे ही वाचा >> Maharashtra News Live : “रोज नवे जोक, देशात जॉनी लिव्हरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राऊतांचा टोला
दरम्यान, केजरीवाल यांनी तुरुंगात त्यांच्याजवळ भगवद्गीता, रामायण हे दोन ग्रंथ ठेवण्याची परवानगी मागितली. तसेच ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड्स’ (How Prime Ministers Decide) हे पुस्तकदेखील त्यांना त्यांच्याजवळ हवं आहे. यासह त्यांनी तुरुंगात धार्मिक लॉकेट परिधान करण्याची परवानगी मागितली. केजरीवालांनी त्यांची औषधं आणि विशेष डाएटची मागणी केली आहे.