पीटीआय, नवी दिल्ली
एक संस्था म्हणून उपयुक्तता कायम राखण्याची न्यायपालिकेने आव्हाने ओळखणे आणि ‘कठीण संभाषणे’ सुरू करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी केले. न्यायालयांची सुनावण्यांसाठी वारंवार ‘तारखा घेण्याची संस्कृती’ आणि दीर्घकालीन सुट्टय़ा अशा मुद्यांनाही त्यांनी स्पर्श केला.
उपेक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या आणि पहिल्या पिढीतील वकिलांना योग्य त्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या उद्घाटनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी प्रमुख पाहुणे होते. देशात होत असलेल्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांचाही न्या. चंद्रचूड यांनी उल्लेख केला.
हेही वाचा >>>नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिथं होतो…”
न्याय व कायदा व्यवसायात पारंपरिकरित्या कमी प्रतिनिधित्व मिळालेल्या महिलांचे प्रमाण आता जिल्हा न्यायाधीशांच्या क्षमतेच्या ३६.३ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वकील आणि न्यायाधीश या दोहोंमध्ये अनुसूचित जाती व जमातींचे प्रतिनिधित्व कमी असल्याचे ते म्हणाले. प्रलंबित खटल्यांची संख्या, पुरातन प्रक्रिया आणि तारीख घेण्याची संस्कृती यांसारख्या न्यायपालिकेच्या दृष्टीने संरचनात्मक मुद्यांवरही न्या. चंद्रचूड यांनी भाष्य केले आणि नजीकच्या भविष्यकाळात या मुद्दय़ांवर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘न्यायाधीश आणि प्रशासक म्हणून आमच्या कामातील प्रयत्न हे नागरिकांचा आधी संबंध येणाऱ्या जिल्हा न्यायालयांची प्रतिष्ठा सुनिश्चित करणे हा असायला हवा’, असेही सरन्यायाधीश म्हणाले.
हेही वाचा >>>Video : मालदीवच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी; राष्ट्राध्यक्ष मुइज्जूच्या पक्षाची दादागिरी
‘सक्षम न्यायव्यवस्था ही विकसित भारताचा भाग’
विद्यमान संदर्भ लक्षात घेऊन सरकार कायद्यांचे आधुनिकीकरण करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. या कायद्यांमुळे उद्याचा भारत आणखी बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सक्षम न्यायव्यवस्था ही विकसित भारताचा भाग आहे. विश्वासार्ह न्यायव्यवस्था तयार करण्यासाठी सरकार सतत काम करत असून अनेक निर्णय घेत आहे असे मोदी म्हणाले.
आपल्या व्यवस्थेत देशातील वैविध्यपूर्ण समुदायांच्या समावेश केल्याने आपली वैधता टिकून राहील. त्यामुळे समाजाच्या विविध समुहातील लोकांनी कायद्याशी संबंधित व्यवसायात यावे यासाठी आपण अधिक प्रयत्न केले पाहिजेत.- न्या. धनंजय चंद्रचूड, सरन्यायाधीश