विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांचा मार्ग मोकळा

ऑस्ट्रेलियाने भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या भारतीय बनावटीच्या करोना लशीच्या वापरास सोमवारी मंजुरी दिली. प्रवाशांचे लसीकरण झाल्याचे निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियात कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियन सरकारने स्पष्ट केले.  

कोव्हॅक्सिन ही लस हैदराबाद येथील भारत बायोटेकने विकसित आणि उत्पादित केली आहे. भारतात कोव्हॅक्सिन आणि अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोव्हिशिल्ड या दोन लशींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. कोव्हिशिल्डला ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिनबरोबरच ‘बीबीआयबीपी-कोरव्ही’ या सिनोफार्म कंपनीने विकसित केलेल्या चिनी लशीलाही मंजुरी दिली. १२ वर्षांपुढील प्रवाशांनी कोव्हॅक्सिन आणि १८ ते ६० वयोगटातील प्रवाशांनी ‘बीबीआयबीपी-कोरव्ही’ लस घेतली असल्यास त्यांचे लसीकरण झाल्याचे मानण्यात येईल, असे ऑस्ट्रेलियाच्या रोगनिवारक वस्तू प्रशासनाने (टीजीए) स्पष्ट केले.

कोव्हॅक्सिन (भारत बायोटेक), बीबीआयबीपी-कोरव्ही (सिनोव्हॅक, चीन) आणि कोव्हिशिल्ड (अ‍ॅस्ट्राझेनेका, भारत) यांना मान्यता दिल्यामुळे या लशी घेतलेले भारतीय, चिनी यांसह अन्य देशांतील नागरिकांना ऑस्ट्रेलियात लसीकरण झालेले प्रवासी समजण्यात येईल, असे ऑस्ट्रेलियन प्रशासनाने सांगितले. या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियात परतू इच्छिणारे परदेशी विद्यार्थी, कुशल आणि अकुशल कामगारांच्या मार्गातील अडथळा दूर झाल्याचेही ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिनला मंजुरी दिली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेने मात्र या लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिलेली नाही. या लशीची परिमाणकारकता आणि सुरक्षितता निश्चित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने  गेल्या आठवड्यात भारत बायोटेकला आणखी काही माहिती सादर करण्यास सांगितले होते. या लशीच्या मंजुरीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत निर्णयाची शक्यता  आहे.

‘डब्ल्यूएचओ’चा  निर्णय आज

‘कोव्हॅक्सिन’ला आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मंजुरीची प्रतीक्षा आहे. लशीची परिमाणकारकता निश्चित करण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ने गेल्या आठवड्यात भारत बायोटेककडून आणखी माहिती मागितली होती. आता बुधवारी होणाऱ्या बैठकीत कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader