भारतामध्ये करोना लसींच्या पुरवठ्यावरुन राज्य विरुद्ध केंद्र असा वाद सुरु आहे. पुरश्याप्रमाणामध्ये लसी उपलब्ध नसल्याने अनेक राज्यांमध्ये लसीकरण प्रक्रिया रडखलीय. असं असतानाच हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीमध्ये तयार झालेल्या लसींच्या संख्येसंदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भारत बायोटेकची निर्मिती असणाऱ्या कोव्हॅक्सिनच्या एकूण निर्मिती आणि पुरवठ्याच्या आकडेवारीत तफावत असल्याचं वृत्त समोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिकृत आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळपर्यंत कोव्हॅक्सिनचे दोन कोटी १० लाख डोस देण्यात आले होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार देशामध्ये आता सहा कोटींहून अधिक लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये निर्यातीसाठीच्या लसींचाही आकडा मोजण्यात आला आहे. भारत बायोटेकने २० एप्रिल रोजी दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये दीड कोटी डोस तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच एप्रिल महिन्यासंपेर्यंत दोन कोटी डोस निर्माण केले जातील असंही सांगण्यात आलेले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा एल्ला यांनी मे महिन्यामध्ये कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या लस उत्पन्नाचा आकडा तीन कोटींवर पोहचेल असं सांगण्यात आलेलं.

त्यामुळेच कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे लसींचं उत्पादन घेतलं नसलं तरी मे महिन्याच्या शेवटपर्यंत साडेपाच कोटी लसी उपलब्ध असायला हव्या होत्या. केंद्राने दोन वेगवेगळ्या प्रतिज्ञापत्रांवर दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यात कोव्हॅक्सिनच्या दोन कोटी लसींचं उत्पादन घेण्यात आलं. यापैकी एक प्रतिज्ञापत्र २४ मे रोजी उच्च न्यायालयासमोर दाखल करण्यात आलं आहे. ५ जानेवारीपासून देशातील लसीकरण मोहीम सुरु होण्याआधी ऐल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीनेकडे लसीकरण सुरु करण्याआधीच दोन कोटी लसींचा साठा उपलब्ध होता. या लसींचाही विचार केला तर एकूण लसींची संख्या ही साडेतास कोटींवर जाते.

या साडेसात कोटींमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीच्या लस उत्पादनाची आकडेवारीचाही विचार केला तर एकूण लसींचा हिशोब आठ कोटींच्या आसपास जातो. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या तुलनेमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लसींचं उत्पादन कमी प्रमाणात झालं होतं. या लसींपैकी काही लसी व्हॅक्सिन डिप्लोमसीअंतर्गत देशाबाहेर निर्यात करण्यात आले. मात्र भारताने एकूण ६ कोटी ६० लाख लसींचे डोस परदेशात पाठवले. यापैकीही सर्वाधिक डोस हे कोविशील्ड लसीचे होते. त्यामध्ये कोव्हॅक्सिनचे डोस हे दोन कोटी इतके होते असं मानलं तर देशात सध्या सहा कोटी लसी उपलब्ध असायला हव्यात. मात्र दोनच कोटी लसी उपलब्ध असल्याचं सांगण्यात येत आहे. या साऱ्या बेरीज वजाबाकीमधून चार कोटी डोसचा हिशोब स्पष्ट होत नसल्याचं दिसतंय.

कोव्हॅक्सिन लसी देणाऱ्या राज्यांमध्ये दिल्ली आघाडीवर असून एकूण लसींपैकी ३१ टक्के लसी या कोव्हॅक्सिनच्या आहेत. देशातील १४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोव्हॅक्सिनचा एकही डोस देण्यात आलेला नाही. तर इतर पाच राज्यांमधील कोव्हॅक्सिनच्या लसींचं प्रमाण एकूण लसीकरणामध्ये पाच टक्क्यांहून कमी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covaxin puzzle 6 crore shots ready 2 crore given where are the rest scsg