करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिन लस प्रभावी आहे, असं इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) एका नवीन अभ्यासात म्हटलं आहे. अँटीबॉडीच्या तटस्थीकरणात थोडीशी घट असली तरी कोव्हॅक्सिन करोनाच्या डेल्टा प्लस आणि बी.1.617.3 प्रकारांवर प्रभावी आहे, असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. कोव्हॅक्सिन लस भारत बायोटेक आणि आयसीएमआरने तयार केली आहे.
“आमच्या संशोधनानुसार कोव्हॅक्सिन करोनाच्या डेल्टा प्लस, एवाय १ आणि B.1.617.3 व्हेरिएंटवर प्रभावी आहे,” असं आयसीएमआरच्या एपिडेमियोलॉजी आणि संसर्गजन्य रोगांचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं. डेल्टा व्हेरियंट धोकादायक असून जगभरात लसीकरण झालेल्या व्यक्तींना देखील वेगाने संक्रमित करतोय. नुकताच डेल्टा व्हेरियंट डेल्टा AY.1, AY.2 आणि AY.3 मध्ये परावर्तीत झाला आहे. यापैकी डेल्टा AY.1 व्हेरियंट ज्याला डेल्टा प्लस म्हटलं जातंय तो यावर्षीच्या एप्रिल महिन्यात सर्वात आधी भारतात आढळला होता. त्यानंतर त्याचा इतर २० देशांमध्येही प्रसार झाला. काही देशांमध्ये तर त्याचं संक्रमण खूप वाढलं आहे. दरम्यान आतापर्यंत डेल्टा AY.1 चा भारतात जास्त प्रसार झालेला नाही. आतापर्यंत देशात डेल्टाचे केवळ ७० रुग्ण आढळले आहेत. तसेच डेल्टा AY.1 या व्हेरियंटवर सध्या उपलब्ध असलेल्या लसींच्या प्रभावाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
कोव्हॅक्सिन लस डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी असल्याबाबत अधिक माहिती सांगणारा एक अहवाल bioRxiv मध्ये प्रकाशित झाला आहे. त्या लेखाच्या प्रमुख लेखिका डॉ. प्रज्ञा यादव म्हणाल्या की, “कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये, पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये आणि लसीकरणानंतर कोरोना झालेल्या लोकांमध्ये अँटिबॉडी तटस्थीकरणात किरकोळ घट आढळली असली तरीही कोव्हॅक्सिन लस ही डेल्टा, डेल्टा एवाय.१ आणि B.1.617.3 या व्हेरियंटच्या विषाणूंवर प्रभावी आहे.”