देशातील करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असताना चिंतेत भर टाकणारी बाब म्हणजे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. अशातच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या आणि सुवर्ण मंदिरात हजुरी रागी (किर्तनकार) काम केलेल्या व्यक्तीचा करोनानं मृत्यू झाला आहे. पंजाबच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात या व्यक्तीला दाखल करण्यात आलं होतं. करोना झाल्याचं निदान झाल्यानंतर या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुवर्ण मंदिरात माजी हजुरी रागी आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीला त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते. करोनासदृश्य लक्षणं दिसून आल्यानं तपासणी करण्यात आली. चाचणी रिपोर्ट आल्यानंतर पद्मश्री प्राप्त व्यक्तीला करोना झाल्याचं निष्पन्न झालं.

अस्थमाचा त्रास असल्यानं या व्यक्तीच्या जिवास धोका असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. प्रकृती ढासळल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. बुधवारी करोना झाल्याचं निदान झाल्यानंतर गुरूवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला. पंजाबच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली.

भारतात ३८ जणांचा मृत्यू –

सार्वजनिक आरोग्य विभागासह इतर स्रोतांकडून माहिती गोळा करून वैद्यकीय शिक्षण खात्याने तयार केलेल्या अहवालात जगभरात ३१ मार्च २०२० पर्यंत करोनाचे ७ लाख ५० हजार ८९० रुग्ण आढळले. त्यात ३६ हजार ४०५ जणांचा मृत्यू झाला. या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ४.८४ टक्के आहे. जगाच्या तुलनेत भारतात १,४६३ करोनाग्रस्त आढळले. यापैकी उपचारादरम्यान ३८ जण दगावले. हे मृत्यूचे प्रमाण जगाच्या तुलनेत २ टक्के कमी आहे.