करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी चीनने कडक निर्बंध घातले असून काही ठिकाणी लोकांना बंदिस्त करण्यात आलं आहे. जगातील सर्वात मोठ्या आयफोन निर्मितीच्या कारखान्यातील कामगारांनाही अशाच प्रकारे बंदिस्त करण्यात आलं असून, कामगार पळ काढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कामगार भिंतींवरुन उड्या मारुन पळून जात असल्याचे व्हिडीओ चर्चेत आहेत. यानंतर चीन प्रशासनाने हा परिसर बंदिस्त केला आहे.
करोना प्रतिबंधक स्वयंसेवक आणि अत्यावश्यक सेवेतील कामगार वगळता कोणीही करोना चाचणी आणि वैद्यकीय सेवा वगळता इतर गोष्टींसाठी परिसरातून बाहेर पडू नये अशी अधिकाऱ्यांनी सूचना केली आहे. चीनच्या झेंगझोऊ एअरपोर्ट इकॉनॉमी झोनच्या अधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले आहेत.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीकडून चालवण्यात येत असलेल्या कारखान्यातून कामागर पळ काढत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कंपनीने या कारखान्यात हजारो कामगारांना नियुक्त केलं आहे. कर्मचारी या ठिकाणी सुविधा नसल्याची तक्रार करत असून, निर्बंधातून अडकू नये यासाठी पळून जावं लागत असल्याचं सांगत आहेत.
विश्लेषण: चीनमधील फॉक्सकॉनच्या ‘आयफोन’ निर्मिती कारखान्यातून कामगार पळ का काढत आहेत?
चीनने ‘झिरो-कोविड’ धोरण अवलंबलं आहे. करोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी लॉकडाउन, टेस्टिंग आणि क्वारंटाइन अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
झेंगझोऊ शहरातील भागात महत्वाचे उद्योग वगळता इतरांना घरुन काम करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र यामध्ये नेमके कोणते उद्योग येतात हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. रस्त्यांवर फक्त वैद्यकीय वाहनं आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.