गेल्या काही दिवसांपासून देशात एका विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे गंगेच्या पात्रात वाहून आलेल्या मृतदेहांची. हे मृतदेह कसे वाहून आले आणि या लोकांचा मृत्यू नेमका कशाने झाला? यासह विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चर्चा सुरू झाल्यानंतर माध्यमांनीही या मुद्द्यावर बोट ठेवलं. त्यामुळे प्रशासनाला कामाला लागावं लागलं. इंडियन एक्स्प्रेसनेही वाहून येत असलेल्या मृतदेहांच्या कारणांचा शोध घेतला. त्यामागील परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी अनेक धक्कादायक आणि विचार करायला लावणारी कारणं समोर आली.
उन्नाव आणि गाझीपूरमधील परिसरात मृतदेह आढळून आल्यानंतर तेथील स्थानिक रहिवाशी, मृतांचे नातेवाईक आणि अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर वेगवेगळी माहिती समोर आली. पारंपरिक रुढी आणि करोनामुळे ओढवलेल्या आर्थिक संकट या वाहत येणाऱ्या मृतदेहामागे आहे. विशेष म्हणजे वाहून आलेल्या अनेक मृतदेहांपैकी अनेकांची सरकार दफ्तरी नोंदही झालेली नाही.
बिहारच्या सीमेपासून ७ किमी अंतरावर असलेल्या गमघर घाट आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि स्थानिक रहिवाशी मागील तीन दिवसांपासून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचं करत आहेत. गमघर घाटावर अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या कमला देवी डोम यांनी याविषयी बोलताना सांगितलं की, “हे असं दृश्य यापूर्वी मी कधीही बघितलं नाही. नदीतील मृतदेहा बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. गुदमरून टाकणाऱ्या मृत्यूच्या दुर्गंधीने हवा दूषित होऊन गेली आहे. गंगेचं पात्र याठिकाणी वळण घेत त्यामुळे इथे मृतदेह जमा होत आहे. ८० पेक्षा जास्त मृतदेह आढळून आले आहेत,” असं त्या म्हणाल्या.
भास्कर घाटावर केस कापण्याचं काम करणाऱ्या प्रदीप कुमार यांनी सांगितलेली माहिती जास्त धक्कादायक आहे. “करोनाच्या दुसऱ्या लाटेत अंत्यसंस्कार करण्याचा खर्चात मोठी वाढ झाली. अंत्यसंस्कारासाठीच्या सरणाचा खर्च पूर्वी पाचशे रुपयांच्या आसपास होता. पण तो खर्च आता दीड हजार ते दोन हजार झाला आहे. आणि अंत्ययात्रेसह अंतिम संस्कारासाठीचा खर्च १० हजारांच्या आसपास आहे,” असं त्यांनी सांगितलं.
जवळपास १५ दिवसांपूर्वी एक स्थानिक व्यक्तीला वाळूत पुरण्यात आलं होत. तो व्यसनी होता. अलिकडेच झालेल्या पावसामुळे वाळू वाहून गेली आणि कुत्र्यांनी त्याचा मृतदेह उकरून वर काढला. अनेक लोक इथे वाळूत मृतदेह पुरत असल्याचंच मी पाहत आहे. कारण ते मृतदेहांवर अंत्यसंस्कार करू शकत नाही, असंही प्रदीप सांगतात.
प्यारे लाल यांचा मृतदेह नदी पात्रात पुरून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा मोटू कश्यप यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता, असं ते म्हणाले. “घाटावर पोहोचल्यानंतर मी अधिकाऱ्यांशी वाद घातला. वडिलांचा मृतदेह वाळूत दफन करण्याच्या मागणीसाठी त्यांच्यासोबत वाद घातला. माझे वडील मृत्यू समयी ८७ वर्षांचे होते आणि वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला होता. मी शेतकरी असून, मला पाच मुली आहेत. मग माझ्याजवळ अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडं, पुजाऱ्याला देण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी पैसे कसे असतील?,” असा सवाल कश्यप यांनी उपस्थित केला.
गंगेच्या पात्रात मासेमारी करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं. एका आठवड्यांपूर्वी शंभराहून अधिक मृतदेह घाटावर काढण्यात आले. मात्र, आता जिल्हा प्रशासनानं मृतदेह वाळूत पुरण्यास सक्त मनाई केली आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही याविषयी खुलासा केला आहे. उत्तर प्रदेश गृह विभागाने राज्यातील सर्व नद्यांवर गस्तीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थाप पथकं आणि जल पोलीस यांना तैनात केलं आहे.
भास्कर घाटावर अनेक मृतदेह वाळूत पुरण्यात आले असल्याची माहिती मला दोन दिवसांपूर्वी मिळाली. मृतदेह दफन करणे ही रुढी आहे. पण आम्ही नागरिकांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहोत. खूप वर्षांपासून हे चालत आलं आहे. भास्कर घाट हा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. इथे चंद्रिका देवीचं मंदिर आहे. उन्नाव, फतेहपूर, रायबरेली इतकंच नाही, तर कानपूरवरूनही इथे लोक अंत्यसंस्कार करण्यासाठी येतात. त्यामुळेच घाटावर आढळून आलेल्या मृतदेहांची संख्या जास्त असेल. मला आतापर्यंत देण्यात आलेल्या माहितीनुसार १५० ते २०० मृतदेह आढळून आले आहेत,” असं उन्नावचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितलं.