करोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या ४० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत चार लाख लोकांनी करोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत करोनामुळे आतापर्यंत सहा लाख २१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान अमेरिकेतील साथरोग विशेषज्ञ डॉ. अँथनी फौची यांनी अलीकडेच करोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ९९.२ टक्के लोक असे आहेत ज्यांनी करोना लस घेतलेली नव्हती असं म्हटलं आहे.
हे मृत्यू खूपच निराशाजनक आहेत कारण ते टाळता आले असते असं डॉ. अँथनी फौची यांनी सांगितलं आहे. एनबीसीच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, “करोनाच्या रुपातील धोकादायक शत्रू आपल्यासमोर असताना आणि त्याच्यावरील गुणकारक उपाय असतानाही दुर्दैवीपणे देशभरात त्यांची अमलबजावणी होत नाही हे निराशाजनक आहे. जर लस वेळेत आली असती तर जगभरातील अनेक मृत्यू टाळता आले असते”.
Covid : लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी, आयसीएमआरचा निष्कर्ष
डॉ. अँथनी फौची यांनी यावेळी अमेरिकेतील काही नागरिकांकडून होणाऱ्या विरोधावरुन टीका करताना काही विचारवंत लसविरोधी आहेत की विज्ञानविरोधी आहेत अशी विचारणा केली आहे. डॉ. अँथनी फौची यांनी लोकांना करोना हा प्रत्येकाचा शत्रू आहे हे समजून घ्या अशी विनंती केली आहे. “पर्याप्त लसीचे डोस उपलब्ध असल्याने अमेरिका भाग्यवान आहे. अमेरिकेतील सर्व लोकांचं लसीकरण होऊ शकतं इतके डोस उपलब्ध आहेत”, असं सांगताना . अँथनी फौची यांनी काही देशातील लोक लस मिळण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
संभाव्य धोके टाळण्यासाठी गर्भवतींचे लसीकरण गरजेचे
करोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. करोनामुळे देशभरात ३९ लाख ९४ हजार लोकांनी आपला जीव गमावला असून यापैकी ६ लाख २१ हजार २९३ लोक एकट्या अमेरिकेतील आहेत. करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेतील ३ लाख ४५ हजार लोकांना करोनाची लागण झाली असून सध्याच्या घडीला ४० लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.