करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही अंशी लोक करोनातून पूर्णपणे बरे होत आहेत. मात्र असे असले तरी करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यात गोल्फपटू अर्जुन भाटी याने चक्क स्वत: जिंकलेल्या ट्रॉफी विकून आर्थिक मदत केली आहे.

IPL 2020 : “क्रिकेटचं नंतर बघू”; पुजाराने IPL आयोजनावरून सुनावलं…

करोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर भारताचा गोल्फपटू अर्जुन याने स्वत: क्रीडा स्पर्धांमध्ये जिंकलेल्या ट्रॉफी विकून देशाला आणि करोनाग्रस्तांना मदत केली आहे. अर्जुनने स्वत: जिंकलेल्या १०२ ट्रॉफी लोकांना विकल्या आणि त्यातून मिळालेले ४ लाख ३० हजार रूपये पंतप्रधान मदत निधीत दान केले. त्याने स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्या ट्विट मध्ये त्याने एक हृदयस्पर्शी किस्सादेखील सांगितला आहे. त्याने जिंकलेल्या ट्रॉफी विकल्यामुळे आणि त्याचा दानशूरपणा पाहून त्याच्या आजीचे डोळे पाणावले. पण पुढच्याच क्षणी आजीने आपल्या नातवाला सुंदर संदेश दिला की सध्या लोकं वाचायला हवीत, ट्रॉफी आणि बक्षिसं परत मिळवता येतील.

१५ वर्षीय अर्जुनने आतापर्यंत सुमापे १५० गोल्फ स्पर्धा खेळल्या आहेत. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड गोल्फ चॅम्पियनशिप स्पर्धेचा अर्जुन विजेता होता. तसेच, या आधी त्याने २०१६ साली १२ वर्षाखालील वयोगटात आणि २०१८ साली त्याने १४ वर्षाखालील वयोगटातून गोल्फ वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवली.

Story img Loader