सध्या संपूर्ण जगावर भीतीचं सावट निर्माण करणारा करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन भारतातही दाखल झाला असल्याची शक्यता असून काही दिवसांमध्ये त्याचा शोध लागेल असं आयसीएमआरचे साथीसंदर्भातील विभागाचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी म्हटलं आहे. सर्वात प्रथम दक्षिण अफ्रिकेत ओमायक्रॉन सापडला होता. ९ नोव्हेंबरला ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली असून तेव्हापासून दक्षिण अफ्रिकेतील प्रवास मोठ्या प्रमाणात झाल्याचं सांगत त्यांनी भीती व्यक्त केली आहे. काही प्रवाशांमध्ये लक्षणं असल्याची माहिती त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली आहे.
“भारतात ओमायक्रॉन आढळल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या विषाणूची संक्रमणक्षमता पाहता काही दिवसात हे होण्याची शक्यता आहे,” असं डॉक्टर पांडा यांनी सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी भारत करोनाचं संकट पुन्हा निर्माण झालं तर पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे.
राज्याच्या निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; हवाई प्रवाशांबाबतच्या नियमांत सुसंगती राखण्याची सूचना
करोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने देशभरातील संबंधित प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले असून विषाणूची अनुवांशिक रचना निश्चित करण्यासाठी अभ्यास करत आहेत. यामुळे वेगवेगळ्या विषाणूंची ओळख पटवण्यात मदत मिळते. “संसर्गास जबाबदार असलेले विषाणू ओळखण्यात ते तज्ज्ञ आहेत,” असं डॉक्टर पांडा यांनी सांगितलं आहे.
दरम्यान यावेळी करोनाला रोखण्यासंबंधी बोलताना लसीकरणामुळे संसर्ग होण्यास प्रतिबंध होत नाही, लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी त्यामुळे करोनाला प्रतिबंध घालता येत नाही असं स्पष्ट केलं. “जर तुम्ही करोनाशी संबंधित नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला लागण होऊ शकते. मास्क, स्वच्छता, गर्दी टाळणं यामधून तुम्ही प्रतिबंध घालू शकता,” असं त्यांनी सांगितलं.
ओमायक्रॉनला किती गांभीर्यानं घ्यावं? एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया सांगतात…
डॉक्टर पांडा यांनी यावेळी एकमेव लस करोनाच्या नव्या विषाणूसोबत लढण्यास मदत करु शकत नाही असं सांगितलं. लसीमुळे इतर आजार, रुग्णालयात जाण्याची वेळ, मृत्यू या गोष्टी टळू शकतात, मात्र संसर्ग रोखता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. अनेक तज्ज्ञांनी ओमायक्रॉनच्या संक्रमणावरुन चिंता व्यक्त केली असून डेल्टाइतकाच भयानक असल्याचं म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी बूस्टर शॉट्ससंबंधी बोलताना लोकांचं आरोग्य प्राथमिकता असून जास्तीत जास्त लोकांनी लसीचे दोन घेतले पाहिजेत यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. बूस्टर डोससाठी पात्र आहेत त्यांना तो दिला पाहिजे, मात्र हे करताना लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे सर्वात प्रथम लसीचे दोन्ही डोस सर्वांनी घेण्याला महत्व दिलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत.