करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका देशाला बसलेला असून ५९४ डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक डॉक्टर राजधानी दिल्लीतील असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. आयएमएकडून राज्यांप्रमाणे डेटा शेअर केला असून यामध्ये दिल्लीनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. एकूण मृत्यूंपैकी ४५ टक्के मृत्यू हे या तीन राज्यांमध्ये झाले आहेत.
करोना महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण १३०० डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याचं आयएमएने सांगितलं आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात १७ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना आयएमएने खुलं पत्र लिहिलं असून त्यांनी करोनाविरोधातील सरकारच्या लढाईला नुकसान पोहोचवलं असल्याचं म्हटलं आहे. रामदेव बाबा यांनी देशातील लोकांमध्ये करोनासंबंधी प्रोटोकॉल आणि लसींसंबंधी गोंधळ निर्माण केला असल्याचं सांगत आयएमएने ही देशविरोधी भूमिका असल्याचा उल्लेख केला आहे.
रामदेव बाबा यांनी आपल्या वस्तूंच्या प्रसिद्धीसाठी संधी साधत करोना उपचारांवरील प्रोटोकॉल आणि लसीकरण मोहिमेविरोधात ही वक्तव्यं केली असल्याचा आरोप आयएमएने केला आहे. सध्याच्या आणि माजी १४ अध्यक्षांची स्वाक्षरी असणाऱ्या या पत्रात रामदेव बाबा यांनी करोनाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या भारत सरकारच्या प्रयत्नांना नुकसान पोहोचवलं असल्याचं म्हटलं आहे. रामदेव बाबा यांच्याविरोधात देशद्रोह तसंच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी आयएमएने केली आहे.