COVID-19 Cases increased : भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. गेल्या २४ तासात देशात ५,३३५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४,४७,३९,०५४ वर गेली आहे. गेल्या १९५ दिवसांमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५,५८७ इतकी आहे. गेल्या वर्षी २३ सप्टेंबर रोजी देशात ५,३८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर कधीही देशात एका दिवसात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले नव्हते. तब्बल सहा महिन्यांनंतर देशात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी कोरोनाबाधित रुग्णांची नवी आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार काल दिवसभरात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी दोन, केरळ आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५,३०,९२९ इतकी झाली आहे.
हे ही वाचा >> “…तेव्हा माझ्यावर दारुवाली बाई अशी टिप्पणी झालेली”, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, “राजकारणात…”
दरम्यान, मंगळवारी (४ एप्रिल) देखील एकाच दिवसात चार हजारांहून अधिक कोरनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी देशात ४,४३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच कोरोनामुळे १५ रुग्णांनी जीव गमावला. यापैकी महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी चार मृत्यू नोंदवण्यात आले. तर छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.