दारु विक्रीवर बंदी असल्यामुळे केरळमध्ये एका माणसाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सनोज कुलांगारा (३८) याने राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली. कुन्नाकुलम पोलिसांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केल्यानंतर केरळ सरकारने या आठवडयापासून दारुविक्री पूर्णपणे बंद केली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता केरळमध्येही सर्वत्र बंद आहे. करोना व्हायरसचा सर्वत्र होणारा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. सनोज कुलांगाराला दारुचे व्यसन होते असे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले. अचानक दारु बंद झाल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्याच्यामध्ये बेचैनी वाढली होती. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

दारुच्या आहारी गेलेल्या अनेकांना अचानक दारु बंद झाल्यामुळे अस्वस्थतता जाणवत आहे. तिरुअनंतपूरममध्ये अशीच लक्षणे आढळलेल्या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशी माहिती केरळच्या पर्यटन मंत्र्यांनी दिली होती. केरळमध्ये अनेकांना दारुचे व्यसन आहे. हा आकडा लाखाच्या घरात आहे. अशा लोकांमध्ये अचानक दारु बंद झाल्यामुळे काही गंभीर लक्षणे दिसू शकतात. राज्य करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असल्यामुळे अशा लोकांना रुग्णालयात दाखल करणे धोकायदक ठरु शकते अशा इशारा मानसोपचार तज्ञांनी आधीच दिला आहे.

 

Story img Loader