करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला रुग्णसंख्येसोबतच बळींच्या संख्येनेही उच्चांक गाठले आहेत. देशात एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असताना रोज चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत असून उपाययोजनांची माहिती घेत आहेत. दरम्यान शुक्रवारी नरेंद्र मोदी एका बैठकीत बोलताना करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी करोनामुळे आपली जीव गमावावा लागणाऱ्यांबद्दल बोलताना मोदींना भावना अनावर झाल्या.

“या व्हायरसने आपल्या अनेक जीवलग व्यक्तींना हिरावून घेतलं आहे. मी त्यांच्याबद्दल नम्र आदर व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. हे बोलत असताना नरेंद्र मोदींना भावना अनावर झाल्याचं दिसत होतं.

नरेंद्र मोदींनी यावेळी करोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढावं लागत असल्याचं सांगितलं. “संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त असून रुग्णांचा रुग्णालयामधील कालावधीदेखील वाढला आहे,” असं त्यांनी म्हटलं.

“लसीकरणामुळे पहिल्या फळीतील योद्ध्यांना संरक्षण मिळालं असून ते लोकांची सेवा करु शकत आहेत. आगामी काळात आपण सर्वांसाठी लसीकरणाची व्याप्ती वाढवणार आहोत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. नरेंद्र मोदींनी यावेळी काळ्या बुरशीचा उल्लेख करत करोनाच्या लढाईदरम्यान नवं संकट निर्माण झालं असून आपण त्यादृष्टीने पूर्वकाळजी आणि तयारी करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले आहेत.

Story img Loader