आरोग्य आणि अत्यावश्यक कर्मचारी तसेच सहव्याधी अशलेले ६० वर्षांवरील नागरिकांना १० जानेवारीपासून वर्धक मात्रा म्हणजेच बुस्टर डोस देण्यात येणार आहे. मात्र या बुस्टर डोसची लस ही पूर्वी घेतलेल्या दोन लसींच्याच कंपनीची असेल की अन्य कंपनीची लस घेऊ शकतो यासंदर्भातील संभ्रमावर केंद्राने उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुस्टर डोस हा पूर्वी घेतलेल्या लसीचाच असेल असं केंद्राने स्पष्ट केलं आहे. निती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. म्हणजेच कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचाच बुस्टर डोस दिला जाईल तर कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांना याच लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा २५ डिसेंबर २०२१ रोजी केली होती. त्याचवेळी आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लसमात्रा (बूस्टर डोस) देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले होते.

येत्या जानेवारीपासून देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करून त्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येईल. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, असे मोदी यांनी नमूद केले होते. या १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याच वेळी पंतप्रधान मोदींनी, आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून वर्धक लसमात्रा देण्यात येईल, असेही सांगितले होते.

देशात करोना आणि त्याच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. त्यात त्यांनी ओमायक्रॉनच्या वेगवान संसर्गाबद्दल सतर्कतेच आवाहन नागरिकांना केले होते. मोदी म्हणाले की जगातील अनेक देशांत ओमायक्रॉनची साथ पसरली असून आपण घाबरून न जाता सतर्क राहण्याची गरज आहे.

करोनाची महासाथ अद्याप संपलेली नसल्याने आपल्याला आणखी खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशाच्या, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही निरंतर काम केले. तज्ञांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाचे टप्पे आणि वयोगट ठरवून मोहीम राबवली. आपल्या लसीकरण मोहीमेला ११ महिने पूर्ण होत असताना आपण लसीकरणाची व्याप्ती वाढवत आहोत, असे मोदी यांनी नमूद केले होते. करोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजपर्यंत १४१ कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून ९० टक्क्यांहून अधिक पात्र नागरिकांनी पहिली लसमात्रा घेतली आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली होती. नव्या ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घाबरून जाऊ नका, मास्क आणि वारंवार हात निर्जंतुक करा, असे आवाहन मोदी यांनी नागरिकांना केले होते.

देशात १८ लाख विलगीकरण खाटा, पाच लाख प्राणवायूयुक्त खाटा, एक लाख ४० हजार अतिदक्षता खाटा, मुलांसाठी ९० हजार खाटा आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिलेली. तसेच देशात ३००० प्राणवायूनिर्मिती केंद्रे असून देशभर चार लाख प्राणवायू र्सिंलडरचे वितरण करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid booster to be of same vaccine as previous 2 shots says government scsg