Lockdown Effect on Moon : कोविडच्या काळात जगभरातील अनेक देशात लॉकडाउन लावण्यात आलं होतं. जगातील अनेक देशात कोविडने थैमान घातलं होतं. या कोविडच्या काळात अनेकांचा मृत्यू देखील झाला. जगभरातील अनेक देशात लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, लॉकडाउन काळात चंद्राचे तापमानही सामान्य तापमानापेक्षा कमी झाले होते, अशी माहिती आता एका अभ्यासामधून समोर आली आहे.
लॉकडाउन काळात पृथ्वीवरील तापमानात आणि प्रदूषणात घट नोंदवली गेली होती. आता त्याचा प्रभाव हा चंद्रापर्यंत झाल्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या पीअर-रिव्ह्यूडमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात असं दिसून आलं आहे की, कोविडच्या काळात एप्रिल-मे २०२० च्या कडक लॉकडाउनच्या कालावधीत चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात घट दिसून आली आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
हेही वाचा : लेबनॉनमधील हेजबोलानंतर इस्रायलचा हुथी बंडखोरांवर हवाई हल्ला; येमेनमधील होदेदाह बंदराला केलं लक्ष्य!
फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे (पीआरएल) के दुर्गा प्रसाद आणि जी अम्बिली यांनी २०१७ आणि २०२३ दरम्यान सहा वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे विश्लेषण केले आहे. यासंदर्भातील माहिती देताना पीआरएलचे संचालक अनिल भारद्वाज यांनी सांगितलं की, “त्यांच्या टीमने अतिशय महत्त्वाचं काम केलं आहे. हे एक वेगळे संशोधन आहे. संशोधनात असं आढळून आलं की, इतर वर्षांच्या तुलनेत लॉकडाऊनच्या वर्षातील तापमान सामान्यपेक्षा ८ ते १० केल्विनने कमी असल्याचे आढळून आलं आहे.”
दरम्यान, या संसोधनासाठी नासाच्या चंद्र रीकोनिसन्स ऑर्बिटरची (Lunar Reconnaissance Orbiter) मदत घेण्यात आली आहे. यामध्ये २०१७ ते २०१३ या दरम्यान चंद्रावर सहा विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी झालेल्या बदलांचं निरीक्षण केलं गेलं. त्यानंतर केलेल्या अभ्यासात लॉकडाउनच्या काळात चंद्राच्या तापमानामध्ये इतर वर्षांच्या तुलनेत सातत्याने ८-१० केल्विनची घट झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.