करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा संपूर्ण देशाची चिंता वाढवली आहे. देशात गेल्या २४ तासात १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत २८.८ टक्के जास्त रुग्ण आढळले आहेत. बुधवारी देशात करोनाचे ९० हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. महत्वाचं म्हणजे देशात सात महिन्यानंतर पहिल्यांदाच एक लाखाहून जास्त केसेस आल्या आहेत. याआधी ६ जूनला एक लाख रुग्ण आढळले होते.
देशात गेल्या २४ तासात १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण आढळले असताना ३० हजार ८३६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील पॉझिटिव्हिटी रेट ७.७४ टक्के इतका आहे.
देशात सध्याच्या घडीला ३ लाख ७१ हजार ३६३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ३ कोटी ४३ लाख ७१ हजार ८४५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एकूण ४ लाख ८३ हजार १७८ जणांचा मृत्यू झाला आहे.
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रात ३६ हजार ६६५ रुग्ण असून यानतंर पश्चिम बंगाल (१५,४२१), दिल्ली (१५०९७), तामिळनाडू (६९८३) आणि कर्नाटकचा (५०३१) क्रमांक आहे. देशातील एकूण ६७.२९ टक्के रुग्ण या पाच राज्यांमधूनच आहेत. तर एकूण ३०.९७ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत.