Coronavirus Outbreak in China: चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असताना परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. लंडनस्थित संशोधक कंपनी Airfinity Ltd च्या अहवालानुसार, चीनमध्ये दिवसाला १० लाख लोकांना संसर्ग होण्याची आणि पाच हजार मृत्यू होण्याची भीती आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या चीनमधील करोनास्थिती गंभीर होऊ शकते असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
अहवालानुसार, जानेवारी महिन्यात चीनमधील रुग्णसंख्या वाढून दिवसाला ३७ लाख रुग्ण आढळू शकतात. मार्च महिन्यात ही संख्या ४२ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. करोनाचा फैलाव सुरु झाल्यापासून Airfinity Ltd त्यावर संशोधन करत असून, सर्व माहिती जतन करुन ठेवली आहे.
चीनने बुधवारी २९९६ रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. तसंच डिसेंबर महिन्यात १० पेक्षी कमी मृत्यू झाले आहेत. पण अचानक झालेली रुग्णवाढ आणि स्मशानभूमींबाहेर अंत्यसंस्कारासाठी झालेली मृतदेहांची गर्दी चीनने जाहीर केलेल्या आकडेवारीवर संशय निर्माण करत आहे.
विश्लेषण : चीनमधील करोनाचे भारतावर सावट किती? येथेही नवी लाट येणार का?
सरकार कशापद्धतीने करोना रुग्णसंख्येची मोजणी करतं हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. चीनने गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात चाचणी केंद्र बंद केले असून स्थानिकांना रॅपिड टेस्टवर अवलंबून राहावं लागत आहे. चाचणी केंद्र बंद केले असल्याने चीनकडे रुग्णांची योग्य आकडेवारी उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींमुळे चीनमध्ये करोनाची स्थिती आणि आकडेवारी यामध्ये विसंगती आहे.
विमानतळांवर विशेष खबरदारी; करोनाबाबत सावधगिरीचे पंतप्रधानांकडून निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. यावेळी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अधिक सावधगिरी बाळगण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार २४ तारखेपासून परदेशातून आलेल्या २ टक्के प्रवाशांची क्रमविरहित करोना नमुना चाचणी केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये देशातील करोनाची सद्य:स्थिती, आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची सज्जता, लसीकरण मोहिमेची परिस्थिती, करोनाचे उत्परिवर्तित विषाणू आणि त्याच्या परिणामांबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयाने निवेदन जारी करून करोनाबाबत उपाययोजनेमध्ये आत्मसंतुष्ट राहू नका आणि सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणांमध्ये सुधारणा करा, अशी सूचना राज्यांना केली. नागरिकांनी करोनाबाबत योग्य जीवनशैली अंगिकारण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले असून, सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याची सूचना केली आहे. विशेषत: सणासुदीच्या काळात, नववर्ष स्वागतावेळी गर्दीच्या ठिकाणी जाताना अधिक सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अधिक धोका असलेल्या आणि वयोवृद्ध नागरिकांना करोना लशीच्या वर्धक मात्रेमुळे (बूस्टर डोस) फायदा होईल, असे ते म्हणाले. करोनाच्या उत्परिवर्तित प्रकारांचा लवकर छडा लागण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या वाढविण्याचे आवाहन त्यांनी राज्यांना केले. करोनाबाबत सर्व आरोग्य यंत्रणा कायम सज्ज अवस्थेत असतील, याची काळजी घेण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे.