देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन लाखांहून अधिक संख्येनं रुग्ण आढळून येत असून, अनेक राज्यांतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी निर्बंध लावले आहेत. मात्र, तरीही संक्रमणाचा वेग थांबता दिसत नाही. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लावण्याची चर्चा सुरू झाली आहे. तशी शक्यताही व्यक्त केली जात असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यावर भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना देशातील रुग्णवाढ, निवडणूक आणि लॉकडाउन यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य केलं. निवडणूक प्रचार आणि करोनाचा उद्रेक यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले,”बघा, महाराष्ट्रात निवडणूका आहेत का? तिथे ६० हजार रुग्ण आहेत. पश्चिम बंगालमध्ये ४ हजार आहेत. महाराष्ट्रालाही माझी सहानुभूती आहे आणि बंगाललाही. करोना रुग्णवाढीला निवडणुकीसोबत जोडणं योग्य नाही. ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यापेक्षा जास्त जिथे निवडणुका नाही झाल्यात तिथे जास्त रुग्ण वाढले आहेत. यावर तुम्ही काय म्हणाल?,” असं शाह यांनी सांगितलं.

लॉकडाउनशी संबंधित प्रश्नावर बोलताना शाह म्हणाले, “देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही. केंद्राकडून तत्परता दाखवली जात नाही, असं नाही. हे खरं नाही. मुख्यमंत्र्यांसोबत दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांना मी सुद्धा उपस्थित होतो. लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. करोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. करोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं लढा देणं थोडं कठिण आहे. पण, मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

विविध राज्यातील लसीकरण तुटवड्यावरही शाह यांनी भाष्य केलं. “आपल्या लसीकरण कार्यक्रमाचा वेग जगात सर्वाधिक आहे. पहिल्या दहा दिवसांत भारतात उच्चांकी लोकांचं लसीकरण केलं गेलं. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमध्ये काही असला पाहिजे. त्यामुळे दुसरा डोस देण्याचा कार्यक्रमाला वेगवान केलं जाऊ शकत नाही. लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वृत्ताशी मी सहमत नाही,” असंही शाह यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid surge assembly elections amit shah lockdown in india bmh
Show comments