देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर जोर देण्यात आला आहे. यासाठी १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरण केलं जात आहे. गरोदर आणि स्तनदा मातांना २ जुलैपासून करोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी गरोदर महिलांनी लस घ्यावी, की नाही? याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जात होते. निति आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी याबाबतचा संभ्रम दूर करत गरोदर महिलांनी करोनाची लस घ्यावी, असं आवाहन केलं आहे. लस घेतल्याने गरोदर महिला आणि बाळाला सुरक्षा मिळेल असंही त्यांनी पुढे सांगितलं. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही लस गरोदर महिल्यांसाठी सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.

“गरोदर महिलांना करोनाची लागण झाली तर त्याचे परिणाम होणाऱ्या बाळावर होऊ शकतात. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत. गरोदर महिलांनी लस घेतली पाहीजे. लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. गरोदर महिलेला करोनाची लागण झाल्यास वेळेआधी प्रसुती होण्याची शक्यता जास्त आहे. असं एका अभ्यासातून समोर आलं आहे”, असं डॉक्टर पॉल यांनी सांगितलं.

गरोदर महिला कोविन अॅपवरून बुकिंग किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात,असंही त्यांनी पुढे सांगितलं. सर्वसामान्यांनी लस घेण्यापूर्वी जी काळजी घ्यावी, तीच काळजी गरोदर महिलांनी घेतली पाहिजे. देशात करोना प्रादुर्भाव सुरु आहे. अशा काळात गरोदर माता आणि बाळांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. गरोदर महिलांनी लस घेतल्यास संरक्षण मिळू शकते.

करोनानंतर झिका विषाणूने चिंता वाढवली!, केरळमध्ये आणखी १४ जणांना झिका विषाणूची लागण

मागील २४ तासात देशभरात ४४ हजार ४५९ रूग्ण करोनातू बरे झाले असून, ४३ हजार ३९३ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, देशात ९११ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे. याचबरोबर देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०७,५२,९५० झाली आहे. आजपर्यंत देशात २,९८,८८,२८४ जण करोनातून बरे झाले आहेत. तर ४,०५,९३९ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४,५८,७२७ आहे. आजपर्यंत देशात ३६,८९,९१,२२२ जणांचे लसीकरण झालेले आहे. यापैकी ४०,२३,१७३ जणांचे मागील २४ तासात लसीकरण झालेले आहे.