कोरोनाच्या तीन लाटा महाराष्ट्रासह देशाने अनुभवल्या आहेत. पहिल्या लाटेत वेगाने होणारा संसर्ग, दुसऱ्या लाटेत होणारे मृत्यू हे देश विसरलेला नाही. तसंच लॉकडाऊनच्याही अनेक कटू आठवणी आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहेत. अशात कोरोना केसेस पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. जे चर्चेत आहे.
काय म्हटलं आहे मनसुख मांडविय यांनी?
चीन, जपान आणि अमेरिकेत कोरोनाचा विळखा वाढतो आहे. त्यामुळे भारतानेही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी एक उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मास्क लावणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर सर्वांनी सतर्क राहावं अशाही सूचना दिल्या आहेत.
मास्क सक्तीची चर्चा
मनसुख मांडवीय यांनी आज झालेल्या बैठकीची माहिती ट्विट करून दिली आहे. तर दुसरीकडे त्यांनी मास्क आवश्यक असल्याचं म्हटलं आहे त्यावरून देशात पुन्हा मास्क सक्ती होणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
मनसुख मांडवीय यांनी असं म्हटलं आहे की जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना संपलेला नाही, आम्ही सर्वांना सतर्क राहण्यच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत. यानंतर नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी कोरोनाबाबत माहिती देताना हे लसीकरणावर भर दिला आहे. फक्त २८ टक्के नागरिकांनी प्रतिबंधात्मक डोस घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची जास्त गरज असल्याचं पॉल यांनी बोलून दाखवलं.
ज्यांना पूर्वीचे आजार आहेत उदाहरणार्थ, मधुमेह, बीपी किंवा हृदयरोग हे ज्यांना आहेत अशा रूग्णांचा आढावा घेतला जाणार आहे. परदेशी जाऊन येणाऱ्या व्यक्तींची चाचणी करणं आवश्यक आहे असंही सांगण्यात आलं आहे. तर केंद्र सरकार दर आठवड्याला देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे.
काय म्हटलं आहे केंद्र सरकारने?
जपान, अमेरिका आणि चीनमध्ये कोरोना रूग्ण वाढले आहेत त्याबाबत खबरदारी घेण्याचे राज्यांना निर्देश
नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी केंद्र सरकारने केलं आवाहन
गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचं आवाहन
राज्य सरकारने नेमकं काय म्हटलं आहे?
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाचे अधिकारी संजय खंदारे यांनी हे स्पष्ट केलं आहे की राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहेत. मुंबई आणि पुणे येथील प्रयोग शाळांमध्ये हे नमुने पाठवले जातील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.