वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चंदिगढ येथे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी गोमातेची महती सांगताना काही विधाने केली. गोमांस हे विषासमान आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच गायीपासून मिळणारे गोमूत्र आणि शेण हे बहुपयोगी असल्याचेही त्यांनी म्हटले. भारतीय लोक घरामधील जमीन आणि भिंती लिंपण्यासाठी शेणाचा वापर करतात. तशाचप्रकारे भारतीय सैन्याची बंकर्स तयार करताना शेणाचा वापर केला जाऊ शकतो, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले. यापूर्वी त्यांनी जामा मिलिया इस्लामिया विद्यापीठातील इफ्तार पार्टीत मुस्लिमांनी मांस खाणे सोडून द्यायला हवे, असे विधान केले होते.
कालच्या कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा याचा उल्लेख करताना गोमांस हे विषासमान असल्याचे सांगितले. जगातील ९० टक्के लोकसंख्या गायीच्या दूधावर अवलंबून असल्यामुळे गायीला ‘माणुसकीची माता’ म्हणावे लागेल. गाय विषारी गोष्टी स्वत:च्या शरीरात ठेवते आणि आपल्याला दूध आणि शेण देते. या शेणाचा वापर सैन्याची बंकर तयार करताना होऊ शकतो. एरवी सामान्य लोकही घरांमध्ये सिमेंट म्हणून शेणाचा वापर करतात. याशिवाय, गोमूत्रामध्ये औषधी शक्ती असून त्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर उपचार होऊ शकतात, असा दावाही इंद्रेश कुमार यांनी केला.
गोमूत्र म्हणजे दुर्धर रोगांवरील रामबाण औषध- मीनाक्षी लेखी
यापूर्वीही त्यांनी मुस्लिम समाजाला मांस खाणे सोडून द्यावे, असे आवाहन केले होते. मुस्लिमांनी मांस खाणे सोडून द्यावे. प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांनी कधीच मांस सेवन केले नव्हते. मांस खाणे हा एकप्रकारचा रोग आहे. तर दूध हे औषध आहे. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांच्या सरबतात दूध घालावे, असे कुमार यांनी म्हटले होते.