गोमाता हा समस्त भाजपवासियांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याचा प्रत्यय मंगळवारी लोकसभेत आला. यापूर्वीही भाजपच्या अनेक नेत्यांकडून जाहीर व्यासपीठांवर गाय आणि गोमूत्र याविषयीची जाहीर व्याख्याने देण्यात आली आहेत. मात्र, काल भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी थेट लोकसभेत गोमूत्राची महती सांगितली. लोकसभेत काल प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा प्रकार घडला. सरकारने गोवंशाशी संबंधित प्राचीन भारतीय विज्ञानाच्या प्रसारासाठी कोणते उपक्रम हाती घेतले आहेत, असा प्रश्न मीनाक्षी लेखी यांनी विचारला. यासाठी त्यांनी माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांच्या आजारपणाचा दाखला दिला. काही दिवसांपूर्वी एक माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल खूप आजारी होते. मात्र, गोमूत्राचे सेवन करायला लागल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली, असे लेखी यांनी सांगितले. यावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही ‘औषध ते औषधच’ अशी टिप्पणी केली. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी लेखी यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. यासंदर्भातील संशोधनासाठी कर्नाल येथे लवकरच राष्ट्रीय गोमंग उत्पादकता केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येणार असल्याची माहिती राधामोहन सिंह यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा