गुजरातमधली उनामध्ये गोहत्येच्या आरोपावरून चार दलितांना गोरक्षक दलाकडून मारहाण करण्यात आली होती. परंतु गोहत्या ही दलितांनी केली नसून तिला सिंहाने ठार केले असल्याचा दावा गुजरात सीआयडी पोलिसांनी केला आहे. एका प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाची नोंद घेत सीआयडीने ही बाब समोर आणली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी गुजरात सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. परंतु दलितांनीच गायीची हत्या केली याची माहिती गोरक्षक दलाला कोणी दिली हे मात्र पोलीसांना समजू शकले नाही.
या मारहणातील पीडिती बालू सावरिया यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ ला दिलेल्या माहितीनुसार त्याने गायीला मारले नसल्याचे सांगितले. त्यांना शेजारच्या गावातून सकाळी आठ वाजता फोन आला होता. येथल्या नाजाभाई अहिर यांनी फोनवरून त्यांची गाय सिंहाने ठार केली असून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुमची मदत हवी असल्याचे सांगतिले होते. त्यामुळे आम्ही तिथे गेले होतो. आधीच ठार केलेल्या मृत गायीची विल्हेवाट लावत असताना तिथे पांढ-या रंगाची गाडी थांबली. त्यांनी आम्हाला पाहिले आणि काही मिनिटांनी ३० ते ३५ जणांच्या जमावाला घेऊन गोहत्येच्या आरोपावरून आम्हाला मारहण करायला सुरूवात केली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
२० जुलैला उना दलित मारहाण प्रकरणचा ताबा गुजरात सीआयडी पोलीसांनी घेतला. चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपींपैकी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. या मारहाणीच्या व्हीडिओ क्लीपचीही पोलीस पाहणी करत असून ही मारहाण कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली हे देखील पोलीस पाहत आहेत.
उना दलित मारहाण प्रकरणावरून देशभरातील वातावरण चांगलेच तापले होते. या मारहणीमुळे गुजरात सरकारवर देशभारातून टीका होत होत्या. गेल्याच आठवड्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील पीडित कुटुंबियांची भेट घेतली होती. या दलित माहरणीचे पडसाद राज्यसभेत देखील उमटले होते. बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायवाती यांनी देखील या प्रकरणावरून गुजरात सरकारला धारेवर धरले होते.
उनामधल्या गायीला दलितांनी नाही तर सिंहाने मारले- सीआयडी
प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाची नोंद घेत सीआयडीने बाब समोर आणली
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 27-07-2016 at 11:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cow was killed by lion not dalit men flogged by gau rakshaks cid