केरळातील कन्नूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी सीपीआयच्या नेत्याने अपमानजनक विधान केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्याचा (ADM) त्यांच्या राहत्या घरातच मृतदेह सापडला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नवीन बाबू यांची केरळ येथील पथानमथित्ता या जिल्ह्यात बदली झाली. त्यामुळे सोमवारी कन्नूर येथे त्यांचं फेअरवेल आयोजित केले होते. परंतु, या कार्यक्रमात सीपीआय नेत्या जिल्हा पंचायत अध्यक्ष पी. पी. दिव्या आमंत्रण देण्यात आले नव्हते, तर जिल्हा अधिकारी अर्जून पंदन हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. परंतु, दिव्या या तावातावाने या कार्यक्रमात आल्या. व्यासपीठावर येऊन त्यांनी नवीन बाबू यांच्या कारकिर्दीविषयी अपमानजनक वक्तव्ये केली.

सार्वजिक ठिकाणी नेमकं काय म्हणाल्या पी. पी. दिव्या?

त्या म्हणाल्या, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देते. ते आता बदली होऊन दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत. आधीच्या दंडाधिकाऱ्यांशी बोलण्याकरता माझ्याकडे अनेक संधी होत्या. पण नवीन बाबू यांच्याशी फारसा संपर्क साधता आला नाही. तरीही मी त्यांना एकदा कॉल केला होता. चेंगलाईतील एका आऊटलेटला ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरता त्यांच्याशी संपर्क साधला होता. या आऊटलेटचे मालक मला सतत भेटायला येत होते. कारण त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नव्हते. मी याबाबत जेव्हा दंडाधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, झिकझॅक रोडमुळे ना हरकत प्रमाणपत्र देण्यास अडचणी येत आहेत. पण ADMची बदली होत असून त्या आऊटलेटला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. त्यांना ना हरकत प्रमाणपत्र कसं मिळालं हे आता मला समजलंय. ते ना हरकत प्रमाणपत्र दिल्याबद्दल आभार मानायला मी येथे आले आहे. आपण आयुष्यात प्रामाणिक राहायला हवं. कन्नूर येथे त्यांनी ज्या प्रमाणे काम केलं, तसं त्यांनी दुसऱ्या ठिकाणी करू नये. चांगल्या पद्धतीने त्यांनी लोकांना मदत केली पाहिजे. ही सरकारी सुविधा आहे आणि काहीतरी घडण्याकरता एक क्षण पुरेसा असतो”, असं पी. पी. दिव्या म्हणाल्या.

हा कार्यक्रम सोमवारी पार पडला. त्यानंतर मंगळवारी सकाळी नवीन बाबू यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळला आहे. हा आत्महत्येचा प्रकार असून पी. पी. दिव्या यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.