आगामी लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा पर्याय ठेवण्यासाठी पावले उचलत असल्याच्या वृत्ताचा माकपने स्पष्ट इन्कार केला. तथापि, तडजोडीसाठी प्रादेशिक पक्षांचा डावा लोकशाही पर्याय पक्ष देऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले.
तिसरी आघाडी ही पक्षाची निवडणूक रणनीती आणि जागावाटप यासाठी तात्पुरती व्यवस्था होऊ शकते, असे माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. काही राजकीय पक्षांची धोरणे आणि कार्यक्रम सातत्याने बदलत राहणारे असल्याने काही प्रादेशिक पक्षांना कायमस्वरूपी पर्यायी आघाडीत स्थान देता येणार नाही, असेही करात म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप आघाडी प्रस्तावित केली आहे त्याबाबत विचारले असता करात यांनी, त्याबाबत माकपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र तृणमूल काँग्रेसशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यूपीए-१ सरकारला ज्याप्रमाणे पाठिंबा देण्यात आला होता त्याप्रमाणे पाठिंबा देता येण्याचा पर्याय माकपच्या काही नेत्यांनी सुचविल्याचे करात यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तेव्हा ही शक्यता फेटाळताना त्यांनी मीडियाने रंगविलेले हे काल्पनिक चित्र असल्याचे सांगितले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तिसऱ्या आघाडीची शक्यता वर्तविली असतानाच एकेकाळचा युपीएचा सहकारी आणि आता त्यांच्यापासून दुरावलेल्या माकपने हा पर्याय फेटाळला.

Story img Loader