राज्यातील विरोधी पक्ष आपल्याबद्दल आणि आपल्या पक्षाबद्दल जितका अपप्रचार करतील तितके आपल्या पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश मिळणे सुलभ जाईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
डावी आघाडी-काँग्रेस आणि भाजपला बॅनर्जी यांनी या वेळी सावध केले, अशा प्रकारे बेछूट आरोप करून काहीही साध्य होणार नाही, निवडणुकीनंतर माकपचे अस्तित्वच संपुष्टात येईल, काँग्रेस दिसणारच नाही आणि भाजप बंगालकडे पाहणारही नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
आम्हाला शहाणपणा शिकविणारे भाजप कोण, त्यांनी केंद्रात आपले काम योग्य प्रकारे करावे, असेही त्या म्हणाल्या. कन्याश्री योजनेसह अन्य प्रकल्पांमध्ये पश्चिम बंगाल पहिल्या क्रमांकावर आहे, आपल्या पाच वर्षांच्या राजवटीत तृणमूलने राज्याला विकासाच्या वाटेवर नेले, असेही त्या म्हणाल्या. माकपने राज्याची तिजोरी रिक्त केली, राज्यावर दोन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत, असेही त्या म्हणाल्या.

भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून ममतांवर रविशंकर प्रसाद यांचा हल्ला
कोलकाता : भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून मंगळवारी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्ला चढविला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भ्रष्टाचाराला आश्रय देत असल्याचा आरोपही प्रसाद यांनी केला. सिंगूर आणि नंदीग्राममधील घडामोडींनंतर ममता बॅनर्जी या प्रामाणिकपणाचे प्रतीक बनल्या होत्या. मात्र तृणमूलच्या पाच वर्षांच्या राजवटीत शारदा चिटफंड घोटाळा, नारद प्रकरणामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडे आता भ्रष्टाचाराच्या आश्रयदात्या म्हणून पाहिले जात असल्याची टीका प्रसाद यांनी केली.

तिसऱ्या, चौथ्या टप्प्यातील सात उमेदवार अशिक्षित
कोलकाता ; पश्चिम बंगालमधील तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी सात उमेदवार अशिक्षित आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीतील सहा उमेदवारांनी आणि चौथ्या टप्प्यातील निवडणुकीतील एका उमेदवाराने आपण अशिक्षित असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे अन्य १४ उमेदवारांचे जुजबी शिक्षण झाले आहे, असे एका अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी अनुक्रमे २१ आणि २५ एप्रिल रोजी मतदान होणार असून १११ जागांवर एकूण ७६३ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
या टप्प्यातील ४४ टक्के उमेदवार इयत्ता पाचवी ते बारावी उत्तीर्ण या वर्गवारीतील आहेत. अन्य ३३ टक्के उमेदवार पदवीधर आहेत. उच्चशिक्षितांची संख्या कमी आहे.

Story img Loader