नवी दिल्ली : काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला ७ दिवस पूर्ण झाले असून गुरुवारी यात्रेचा विश्रांतीचा दिवस होता. पण दीडशे किमीचा टप्पा पार करणारी ही पदयात्रा नव्या वादात सापडली आहे. बिगरभाजप पक्षांपैकी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) काँग्रेसवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. केरळमध्ये यात्रा १८ दिवस मग, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये का नाही, असा सवाल उपस्थित करून ‘माकप’ने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
केरळमधून कर्नाटकमध्ये पोहोचण्यासाठी सुमारे ३७० किमीचे अंतर पार करावे लागेल. त्यासाठी किमान १८ दिवस लागणार असल्याने केरळमध्ये यात्रेसाठी इतके दिवस दिले आहेत. ५६ इंची छाती असलेल्या ‘सुपरमॅन’लाही त्यापेक्षा कमी दिवसात कर्नाटकला पोहोचणे जमणार नाही. याचा विचार न करता ‘माकप’ आरोप करत असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे.
‘माकप’ने ट्वीट करून काँग्रेसवर टीका केली असून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये यात्रा का जात नाही, असा सवाल केला आहे. केरळमध्ये १८ दिवस, उत्तर प्रदेशमध्ये २ दिवस असेल. हा संघ आणि भाजपविरोधात लढण्याचा अजब प्रकार असल्याची टीका केरळचे मुख्यमंत्री व माकपचे नेते पी. विजयन यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध प्रादेशिक पक्ष असा नवा वाद यात्रेमुळे सुरू झाला आहे.
कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यांमध्ये काँग्रेस प्रमुख्याने भाजपविरोधातच लढत आहे. त्यामुळे भाजपविरोधात लढणारी राज्ये पदयात्रेत वगळण्यात आल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी केला आहे. केरळमध्ये सत्ताधारी माकपचे आघाडी सरकार भाजपचा ‘ए’ चमू आहे. इथे थेट भाजपविरोधात नव्हे, तर त्यांच्या ‘ए’ चमूशी लढत आहोत आणि इथे आम्ही १८ दिवस काढत आहोत, असे रमेश म्हणाले.
गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार असल्या तरी, त्याचा ‘भारत जोडो’ यात्रेशी काहीही संबंध नाही. या यात्रेचा वापर निवडणूक प्रचारासाठी केला जाणार नाही. त्यामुळे ही यात्रा गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये जाणार नाही. ७ सप्टेंबरला कन्याकुमारीपासून यात्रा सुरू झाली व गुजरातला पोहोचायला ९०-९५ दिवस लागतील. तोपर्यंत गुजरातमधील निवडणूक झालेली असेल. हीच स्थिती हिमाचल प्रदेशबाबतही असेल. तिथेही निवडणूक पार पडलेली असेल, असा युक्तिवाद रमेश यांनी केला.
७ दिवसांनंतर विश्रांती
यात्रेकरूंनी गुरुवारी केरळमध्ये कोलम येथे विश्रांती घेतली, शुक्रवारपासून ही यात्रा पुन्हा सुरू होईल. आठवडाभरातील यात्रेतील अनुभवाची मीमांक्षा करण्यात आली व पुढील सात दिवसांच्या यात्रेच्या नव्या टप्प्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. यात्रेकरूंचे ९ गट करून विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल केरळच्या यात्रेत सहभागी होणार आहेत. प्रियंका गांधी-वाड्रा या अजून सहभागी झालेल्या नाहीत. पण, काँग्रेसकडून त्यांच्या सहभागाची शक्यता व्यक्त केली गेली आहे. २३ सप्टेंबर रोजीही यात्रेचा विश्रांतीचा दिवस असेल. आसाम,
पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, ओदिशा या राज्यांमध्ये भारत जोडो यात्रा जाणार नसल्याने या संदर्भात कार्यक्रम घेण्यासाठी जयराम रमेश व दिग्विजय सिंह हे दोघे शुक्रवारपासून, १६ सप्टेंबरनंतर या राज्यांमध्ये जाणार आहेत.
काँग्रेसची आता पूर्व-पश्चिम पदयात्रा? ; गुजरात ते अरुणाचल प्रदेश यात्रा काढण्याचे पक्षाचे संकेत
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ सुरू असून लवकरच पूर्व-पश्चिम भारत जोडो यात्रा काढण्यात येणार असल्याचे संकेत पक्षाच्या वतीने देण्यात आले. गुजरातमधून या पदयात्रेचा प्रारंभ होऊन अरुणाचल प्रदेशात ती समाप्त होईल, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने सांगण्यात आले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा पुढील आठवडय़ात समाप्त होणार आहे. या पदयात्रेने काँग्रेससाठी एक नवी प्रतिमा तयार केली असून पक्ष संघटना मजबूत करताना भारतीय राजकारणात परिवर्तन घडवून आणले आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी गुरुवारी केरळमधील कोलाम येथे सांगितले. ‘‘काँग्रेसच्या पदयात्रेला चांगलेच यश मिळत असून पुढील वर्षी पश्चिम ते पूर्व अशी पदयात्रा होण्याची शक्यता आहे. ही यात्रा गुजरातमधील पोरबंदर येथून सुरू होऊन अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंडपर्यंत असेल, असे रमेश यांनी सांगितले. भारत जोडो यात्रेमुळे भारतीय राजकारणात बदल होईल आणि काँग्रेस पक्षाला बळकटी मिळेल, असेही रमेश यांनी सांगितले.
मोदींवरील टीकेमुळे माकप नेते नाराज का?
‘भारत जोडो’ यात्रेवरील टीकेमुळे काँग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला लक्ष्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फॅसिस्ट विचारसरणीच्या लोकांना प्रश्न विचारल्यानंतर ते नाराज का होतात, असा प्रश्न उपस्थित केला. केरळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते व्ही. डी. सतीशन यांनी मार्क्सवादी पक्षावर शब्दिक हल्ला केला. पदयात्रेत सहभागी झालेले राहुल गांधी आणि अन्य नेते कंटेनरमध्ये रात्री राहतात. यामध्ये त्यांना चुकीचे काय दिसते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.