नवी दिल्ली : ब्रह्मपुत्रेचे पाणी वळवून पुराचा सामना करण्यासाठी आणि कृषी, सिंचन आणि पर्यटनाच्या विकासासाठी ईशान्य भारतात किमान ५० मोठे तलाव उभारण्यात यावेत, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिले. पावसाळ्यातील पूर व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत शहा यांनी पूर आणि पाणी व्यवस्थापनासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ईस्राे) उपग्रह प्रतिमांचा वापर करण्याच्या सूचनाही यंत्रणांना दिल्या.
हेही वाचा >>> पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे चीनची दूरसंचार उपकरणे
शहा यांनी ‘ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड’चा (जीएलओएफ) सामना करण्याच्या तयारीचा आढावाही घेतला. उत्तम पूर व्यवस्थापनासाठी नद्यांच्या पाण्याच्या पातळीची अंदाज प्रणाली सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच ईशान्येकडे किमान ५० मोठे तलाव तयार केले जावेत जेणेकरुन ब्रह्मपुत्रेचे पाणी या तलावांमध्ये वळवता येईल आणि साठवता येईल. यामुळे कमी खर्चात कृषी, सिंचन आणि पर्यटन विकास तसेच पूरस्थिती हाताळण्यासही मदत होईल, असे शहा म्हणाले.
ब्रह्मपुत्रेला वारंवार येणारा पूर ही आसाम आणि ईशान्य प्रदेशाची प्रमुख समस्या आहे. यात दरवर्षी अनेकांचा बळी जातो आणि जमीन पाण्याखाली जाते. गेल्या काही वर्षांत सिक्कीम आणि उत्तराखंडमध्येही अनेकांचा मृत्यू झाला, नागरिक बेघर झाले आणि दळणवळणाचे मार्ग खंडित झाले. पूर आल्यास पाणी वाहून जाण्यासाठी रस्ते बांधणीच्या आराखड्यात नैसर्गिक नाले अविभाज्य भाग असावा, असे शहा म्हणाले.