दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या खात्म्यासाठी अमेठीत जगातील अत्याधुनिक एके-२०३ रायफलची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. अमेठीत या रायफलच्या निर्मिती प्रकल्पाचे तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीत मोदींची पहिल्यांदाच जाहीर सभा झाली. यावेळी देशाचे जवान लवकरच ‘मेड इन अमेठी’ रायफल वापरण्यास सुरुवात करतील अशा शब्दांत त्यांनी राहुल यांना टोला लगावला.

मोदी म्हणाले, जगातील अत्याधुनिक रायफल एके-२०३ रायफलची मेड इन अमेठीत निर्मिती केली जाणार आहे. भारत आणि रशियाचा संयुक्त निर्मितीतून ही रायफल तयार होणार आहे. यासाठी मी माझे मित्र आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांना धन्यवाद देतो की त्यांच्या सहकार्याने खूपच कमी वेळेत हे शक्य झाले.

यावेळी जनतेशी संवाद साधताना मोदी म्हणाले, काही लोक जगात फिरता फिरता मेड इन उज्जैन, मेड इन जयपूर, मेड इन जैसलमेर अशी भाषणं देत आहेत. मात्र, त्यांची ही भाषणेच राहुन जातील कारण मोदी याबाबत वेगवान आहेत. त्यामुळे आता जवानांच्या हाती लवकरच ‘मेड इन अमेठी’ एके-२०३ रायफल असतील.

जनतेची मतं मिळाल्यानंतर त्यांना विसरुन जाण्याची काही जणांना सवय असते. त्यांना गरीबी कायमच ठेवायची असते त्यामुळे ते पिढ्यान पिढ्या गरीबी हटाओचा नारा देत आहेत. मात्र, गरीबीतून बाहेर येण्यासाठी आम्ही गरीबांची ताकद वाढवली. आम्ही अमेठीत निवडणूक हारलो मात्र, आम्ही इथल्या जनतेची मनं जिंकली आहेत. गेल्या ५ वर्षांत स्मृती इराणींनी इथल्या भागाच्या विकासासाठी खूप चांगलं काम केलं आहे. त्यांनी कधीही तुम्हाला त्यांना जिंकून दिल्याबद्द्ल किंवा न दिल्याबद्दल दुजाभाव केला नाही. इथून जे जिंकले त्यांच्यापेक्षा जास्त काम इराणींनी केल्याचे मोदी म्हणाले.

Story img Loader