तेलंगण या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीमुळे केवळ नवीन राज्यांच्या मागणीलाच प्रोत्साहन मिळणार नाही तर नवीन जिल्ह्य़ांच्या निर्मितीची मागणीही  वाढून परिणामी देश कमकुवत होईल, अशी भीजी भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी आंदोलन छेडणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी व्यक्त केली.
जनतंत्र यात्रेनिमित्त उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या हजारे यांनी आझमगड येथे पत्रकारांशी बोलताना ही भीती व्यक्त केली.
केंद्र सरकारने स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या सुरू केलेल्या प्रक्रियेमुळे इतरही स्वतंत्र राज्यांच्या मागणीला जोर येईल आणि त्यानंतर स्वतंत्र जिल्हे व्हावेत, यासाठी जोर धरला जाईल. या एकूणच प्रक्रियेमुळे देश अधिक कमकुवत होईल, अशी भीती हजारे यांनी व्यक्त केली.
भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनातील सहकारी अरविंद केजरीवाल आणि योगगुरू रामदेव यांनी वेगळा गट स्थापन केला असला तरी आपल्या आंदोलनाला लोकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. तसेच आपल्या सहकाऱ्यांपैकी अथवा आपल्या संघटनेतील कोणीही व्यक्ती निवडणुकीत भाग घेणार नाही तसेच भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलन तसेच पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार हजारे यांनी व्यक्त केला.
स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्ती संसदेत जाव्यात, यासाठी आपण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जनतंत्र यात्रेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश सरकारने आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई दुर्दैवी आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांची आधीच कमतरता असून सरकारने आपल्या निर्णयाबाबत फेरविचार करावा, अशी विनंतीही त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला केली.
दरम्यान, भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरील आपले आंदोलन सुरूच राहणार असून केंद्र सरकारने जनलोकपाल विधेयक मंजूर करावे, यासाठी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण उपोषण करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Story img Loader