स्वतंत्र तेलंगण राज्याचा मुद्दा काँग्रेसनेच दीर्घकाळ प्रलंबित ठेवला आणि आता केवळ निवडणुकांवर डोळा ठेवूनच त्यांनी या राज्याच्या निर्मितीचा निर्णय घेतला आहे, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केली. तेलंगण राज्याच्या निर्मितीचे स्वागत करतानाच या वेळीतरी काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम राहील काय, अशीही शंका मोदी यांनी उपस्थित केली.
तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या मुद्दय़ावर काँग्रेसने गेली नऊ वर्षे पळ काढला होता परंतु लोकांच्या दबावामुळेच त्यांना या निर्णयाप्रती येणे भाग पडले आहे. त्यांच्या या चालीमुळे या प्रश्नाचे गांभीर्य आणि एकूणच हेतू याबद्दल काही गंभीर शंका उपस्थित होतात, असे मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला लिहिलेल्या  पत्रामध्ये नमूद केले आहे. या प्रश्नी लोकांना सामोरे जाण्याऐवजी केवळ समित्या आणि अहवालांमागेच काँग्रेस पक्ष दडून बसला होता. या मुद्दय़ावर काँग्रेस आता लोकांची माफी मागणार आहे काय, अशीही विचारणा मोदी यांनी या निमित्ताने केली.
तेलंगणाच्या मुद्दय़ावर काँग्रेसची भूमिका कधीही पारदर्शक आणि सातत्यपूर्ण नव्हती, असा आरोप करून निवडणुका होण्यासाठी काही महिन्यांचाच अवधी असताना घेतलेल्या या निर्णयामागे राजकीय रंगसंगतीच दिसते, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

Story img Loader