देशातील एकूण दहा शाळांची कल्पक शाळा (चेंजमेकर स्कूल ) म्हणून निवड झाली आहे. शिक्षणात नवीन पद्धतींचा वापर व विद्यार्थी विकासासाठीचे प्रयत्न या निकषांवर ही निवड केली आहे. त्यात मुंबईची आर.एन.पोद्दार व पुण्याची केसीटी विद्यानिकेतन या शाळांचा समावेश आहे.

नवी दिल्ली येथे दोन दिवसांची अशोका चेंजमेकर स्कूल्स परिषद झाली त्यात या शाळांनी संस्थात्मक निकष चांगल्या पद्धतीने पाळल्याचे स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थी, पालक, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते यांना शिक्षणविषयक दृष्टिकोनासाठी एक मंच उपलब्ध व्हावा म्हणून ही परिषद घेण्यात आली. देशातील तीस शहरांत ६० शाळांमध्ये पाहणी करून ही निवड करण्यात आली आहे. नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्याशी संबंधित असलेल्या अशोका फाउंडेशनने हा पुढाकार घेतला आहे. शिक्षण क्षेत्रात सर्वंकष प्रभाव पाडणाऱ्या शाळांची निवड यात करण्यात आली. अशोका फाउंडेशनचे दक्षिण आशिया प्रतिनिधी विष्णू स्वामीनाथन यांनी सांगितले की, चेंजमेकर पाहणीतून आम्ही शाळा व शिक्षण विषयक एकूणच परिस्थितीचा व बदल कौशल्यांचा वितार केला आहे. बदल हा शाळांच्या माध्यमातून होत असतो शिवाय समाजाची मनोवृत्ती बदलणेही आवश्यक असते. निवड झालेल्या दहा शाळांमध्ये दिगंतर विद्यालय-जयपूर, रिव्हरसाईड स्कूल- अहमदाबाद, टीव्हीएस अ‍ॅकॅडमी- होसूर, या शाळांचा समावेश आहे.

Story img Loader