अमेरिकी मालकीच्या बेकायदेशीररीत्या शस्त्रास्त्रे व दारूगोळा घेऊन जाणाऱ्या एका जहाजावरील ३३ कर्मचाऱ्यांना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली. हे जहाज कोणतीही परवानगी नसताना भारतीय सागरी हद्दीत आले होते.
क्यू ब्रँट सीआयडी पोलिसांनी सांगितले की, एकूण ३५ शस्त्रे व ५६८० काडतुसे इतका दारूगोळा या वेळी ‘एमव्ही सीमन गार्ड ओहियो’ या जहाजातून जप्त करण्यात आला. १२ ऑक्टोबरपासून ही कारवाई सुरू आहे. या जहाजावर एकूण ३५ कर्मचारी होते, त्यातील ३३ सदस्यांना मुथियापुरम पोलिसांनी आज सकाळी अटक केली, त्यांचे जबाब घेण्यात आले व नंतर सर्व सोपस्कार पूर्ण करून अखेर त्यांना अधिकृतरीत्या अटक करण्यात आली.
पोलिसांच्या चेन्नई येथील अधिकृत निवेदनानुसार शस्त्रास्त्र कायदा १९५९, जीवनावश्यक कायदा १९५९, मोटर स्पिरिट अँड हाय स्पीड डिझेल प्रिव्हेन्शन ऑफ मालप्रॅक्टिसेस सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑर्डर १९९० अन्वये या जहाजाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कुठलीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. या कर्मचाऱ्यांना जहाजावर राहण्यास परवानगी दिली असून पुढील व्यवस्था होईपर्यंत जहाज दुरूस्ती करण्यासही परवानगी दिली आहे; परंतु तरीही ते अटकेत आहेत. या कर्मचाऱ्यांनर बेकायदेशीर मार्गाने १५०० लिटर डिझेल खरेदी केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी सांगितले की, थारूवैकुलम मरिन पोलिस स्टेशन येथे १३ ऑक्टोबरला भारतीय तटरक्षक दलाचे तुतिकोरीन येथील असिस्टंट कमांडंट यांनी तक्रार दाखल केली होती.