आयपीएलच्या सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱया एस. श्रीशांत याच्यासह अन्य दोन खेळाडूंना अटक केली. पोलिसांनी दिल्लीमधून चार आणि मुंबईमधून तीन बुकींनाही ताब्यात घेतले आहे. 
श्रीशांत याला त्याच्या मुंबईतील मित्राच्या घरातून तर अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमधून दिल्ली पोलिसांनी अटक केली. मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या दोघांना दिल्लीला नेण्यात येणार आहे. या तिन्ही क्रिकेटपटूंना आयपीएलमधून निलंबित करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा विषय शिस्तपालन समितीकडे दिला आहे.
मुंबई आणि मोहालीमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये या तिघांनी स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाचे पथक गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत दाखल झाले होते. राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना सुरू असल्यामुळे बुधवारी संध्याकाळपर्यंत कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी ट्रायडंट हॉटेलमध्ये जाऊन तिथूनही आवश्यक माहिती मिळवली असल्याचे समजते.
दरम्यान, घडल्याप्रकारामुळे आम्हाला धक्का बसला असून, आम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या संपर्कात आहोत. संघात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया राजस्थान रॉयल्स संघाच्यावतीने देण्यात आली आहे.

Story img Loader