ग्रहदशा बदलल्यामुळे महिलांवर अत्याचार होत आहेत, अशी मुक्ताफळे छत्तीसगडचे गृहमंत्री नानकी राम कंवर यांनी उधळली आहेत. कांकेर येथील सरकारी आश्रमशाळेतील नऊ मुलींचे शिक्षकांनीच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही मुक्ताफळे उधळली.
ते म्हणाले, ‘‘महिलांवरील अत्याचारांसंदर्भात माझ्याकडे कोणतेही उत्तर नाही. संबंधित महिला तसेच तरुणींचे ग्रह ठीक नसल्याने त्यांना या दुर्दैवी  प्रकाराला सामोरे जावे लागले असावे. एखाद्या व्यक्तीचे ग्रह चांगले नसतील तर त्याला त्याचा फटका बसतोच. त्यामुळे या समस्येवर आपल्याकडे उत्तर नसून याबाबत ज्योतिषीच काय ते सांगू शकतील.’’
कंवर यांचे व्यक्तव्य म्हणजे बालीश आणि असभ्य असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नंदन कुमार पटेल यांनी सांगितले. सरकारी निवासी शाळेतील विद्यार्थिनींना सुरक्षा पुरविण्यास राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत, काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल शेखर दत्त यांची भेट घेऊन भाजप सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.  

बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षाही अपुरी  
महिलांवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षाही अपुरी असल्याचे मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी मंगळवारी व्यक्त केले. राज्यातील कांकेर जिल्ह्यातील आदिवासी कन्या शाळेतील नऊ मुलींवर बलात्कार झाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे, याप्रकरणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणात कठोर शिक्षा आवश्यक असल्याची गरज व्यक्त केली.

काटजू यांची टीका
दिल्लीत अलीकडेच झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी साकेत बार असोसिएशनच्या वकील सदस्यांनी केलेल्या वर्तनावर प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. मरकडेय काटजू यांनी टीका केली आहे. बलात्कारप्रकरणी संशयित आरोपीचा बचाव करणाऱ्या वकिलावर अन्य सदस्यांनी दबाव आणण्यासाठी केलेल्या कृतीमुळे काटजू नाराज झाले आहेत. या आरोपींना न्यायालयात आणण्यात आल्यानंतर मनोहरलाल शर्मा या वकिलाने आरोपीच्या बाजूने उभे राहण्याची तयारी दर्शविल्यामुळे साकेत बार असोसिएशनच्या काही वकील सदस्यांनी शर्मा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून तेथे गोंधळ घातला. प्रगतिशील महिला संघटन या सेवाभावी संस्थेच्याही काही महिला सदस्यांनी शर्मा यांच्या विरोधात घोषणा देऊन आरोपीवर गंभीर गुन्ह्य़ाचा आरोप ठेवण्यात आल्यामुळे त्याचे वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी केली होती.

भारतामधील निदर्शने ‘अरब स्प्रिंग’ची आवृत्ती
दिल्लीमधील  बलात्कारप्रकरणी संपूर्ण देश निदर्शनात लोटला, ही घटना अरबी राष्ट्रांमध्ये गेल्या वर्षी झालेल्या क्रांतीची भारतीय आवृत्ती असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक फरीद झकारिया यांनी व्यक्त केले.  मात्र हे आंदोलन  खरोखरच्या सुधारणा आणि बदलांना राज्यकर्ते राबवेपर्यंत सुरू राहायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दिल्लीमध्ये गेल्या महिन्यामध्ये झालेल्या भीषण बलात्कारास जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील भारतीय दूतावासासमोर निदर्शने करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी घोषणा करण्यात आल्या आणि पत्रके वाटण्यात आली. ‘साऊथबॉल ब्लॅक सिस्टर्स’ या अल्पसंख्य व महिला हक्कपुरस्कर्त्यां संघटनेच्या वतीने ही निदर्शने आयोजित करण्यात आली.

Story img Loader