ग्रहदशा बदलल्यामुळे महिलांवर अत्याचार होत आहेत, अशी मुक्ताफळे छत्तीसगडचे गृहमंत्री नानकी राम कंवर यांनी उधळली आहेत. कांकेर येथील सरकारी आश्रमशाळेतील नऊ मुलींचे शिक्षकांनीच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही मुक्ताफळे उधळली.
ते म्हणाले, ‘‘महिलांवरील अत्याचारांसंदर्भात माझ्याकडे कोणतेही उत्तर नाही. संबंधित महिला तसेच तरुणींचे ग्रह ठीक नसल्याने त्यांना या दुर्दैवी प्रकाराला सामोरे जावे लागले असावे. एखाद्या व्यक्तीचे ग्रह चांगले नसतील तर त्याला त्याचा फटका बसतोच. त्यामुळे या समस्येवर आपल्याकडे उत्तर नसून याबाबत ज्योतिषीच काय ते सांगू शकतील.’’
कंवर यांचे व्यक्तव्य म्हणजे बालीश आणि असभ्य असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नंदन कुमार पटेल यांनी सांगितले. सरकारी निवासी शाळेतील विद्यार्थिनींना सुरक्षा पुरविण्यास राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत, काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल शेखर दत्त यांची भेट घेऊन भाजप सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा