Kerala Crime : देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. खून, दरोडा, लैंगिक अत्याचार, हिंसा, गोळीबार, जाळपोळ, हाणामारी, जोडप्यामध्ये मतभेदामुळे घडलेल्या खूनाच्या घटना अशा अनेक वेगवेगळ्या घटना सातत्याने समोर येत असल्याचं पाहायला मिळतं. आता केरळमध्ये एक अशीच धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून स्वत:ही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील व्यक्तीचं नाव कृष्णकुमार असं आहे, तर पत्नीचं नाव संगीता असल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णकुमार आणि पत्नी संगीता यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेत सुरु होते, यावरून त्या दोघात नेहमी वाद होत असायचा. तसेच पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पती कृष्णकुमारला होते. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. या मतभेदामुळेच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दाम्पत्याच्या पश्चात त्यांना दोन मुली देखील आहेत. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
कृष्णकुमार (५२) यांनी सोमवारी पहाटे केरळमधील वंदाझी येथील त्यांच्या घरापासून थेट तामिळनाडूतील कोईम्बतूर असा थेट ८३ किलोमीटर प्रवास केला. तेथे गेल्यानंतर त्यांनी पत्नी संगीता यांची भेट घेतली. त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर कृष्णकुमारने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर काही मिनिटांतच कृष्णकुमार आपल्या गाडीने पुन्हा परत घरी परतला. घरी पोहोचताच कृष्णकुमारने त्यांच्या वडिलांसमोरच गोळी झाडून स्वत:चंही जीवन संपवंल.
दरम्यान, कृष्णकुमारने गोळी झाडून स्वत: आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. दुसरीकडे कृष्णकुमारने पत्नीचीही गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेनंतर घाबरलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णकुमारने पत्नीला तिच्या मित्राशी मैत्री करण्यास मनाई केली होती. तसेच हे दोघे अर्थात कृष्णकुमार आणि त्याची पत्नी हे वेगळे राहत होते. तसेच ते विभक्त होण्यासाठी चर्चा देखील करत होते. मात्र, त्याआधीच कृष्णकुमारने त्याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केली व त्यानंतर स्वत:चंही जीवन संपवलं.