इंजिनिअर आणि डॉक्टर असल्याचं भासवून एका भामट्याने १५ महिलांशी लग्न केल्याचा आणि त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. एका मॅट्रीमोनिअल साईटचा आधार घेऊन या भामट्याने हे कृत्य केलं आहे. बंगळुरुतल्या मैसूर शहरात ही घटना घडली आहे. २०१४ पासून या भामट्याने कमीत कमी १५ महिलांची फसवणूक केली आहे. या लग्नांमधून त्याला चार मुलंही झाली आहे. महेश केबी नायक असं या ३५ वर्षीय भामट्याचं नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मैसूरमधला आहे हा सगळा प्रकार

महेश केबी नायक हा बंगळुरुतल्या बनशंकरी भागातला राहणारा आहे. मैसूरच्या एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने त्याच्या विरोधात तक्रार केली त्यामुळे तो पकडला गेला. या सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने या वर्षाच्या सुरुवातीला महेशच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी पथकं तयार केली. तसंच महेश नायकला तुमकुरुमधून अटक करण्यात आली आहे.

महेश फक्त पाचवी शिकलेला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महेश हा फक्त पाचवी शिकलेला आहे. तो स्वतःला इंजिनिअर, डॉक्टर आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असल्याचं सांगत तो महिलांची फसवणूक करत असे आणि त्यांच्याशी लग्न करुन त्यांना फसवत असे. १५ महिलांशी लग्न केल्यानंतर त्याला चार मुलंही झाली आहेत. आरोपी महेशच्या विरोधात आणखी एका महिलेने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. तिनेही महेशच्या विरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे.

महेश नायकने एक बनावट दवाखानाही उघडला होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश नायकने तुमकुरु मध्ये एक बनावट दवाखानाही उघडला आणि आपण डॉक्टर आहोत हे भासवण्यासाठी एका नर्सचीही तिथे नियुक्ती केली. मात्र महेशच्या इंग्रजी बोलण्यात अनेक चुका होत असल्याने अनेक महिलांना त्याच्यावर संशय आला. त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय अनेक महिलांनी बदलला असंही समजतं आहे.

महेशने ज्या १५ महिलांची फसवणूक केली त्यापैकी बहुतांश महिला या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. त्यापैकी एका पीडित महिलेने क्लिनिक उघडण्यासाठी महेशने पैसे मागितले होते असाही आरोप केला आहे. त्यानंतर तो तिचे दागिने आणि पैसे घेऊन फरार झाला असंही या महिलेने सांगितलं आहे. अनेकदा महिला आपली समाजात लाज निघेल म्हणून गप्प राहिल्या आणि महेशचं फावायचं असंही पोलिसांनी सांगितलं आहे. आता त्याला अटक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news bengaluru man posing himself as doctor and engineer and married with 15 women now arrested scj