Crime News वाराणसीत १९ वर्षांच्या मुलीवर २३ जणांनी बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीवर सहा दिवस सामूहिक बलात्कार झाला. ज्यानंतर ही मुलगी या घटनेने पूर्णपणे खचून गेली आहे. एवढंच नाही तर या घटनेने देशात काय चाललं आहे? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

वाराणसीतली नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेवर २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत २३ जणांनी सामूहिक बलात्कार केला. या पीडितेच्या कुटुंबाने या संदर्भातली तक्रार ६ एप्रिल रोजी दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात कलम ७० (१) (सामूहिक बलात्कार), कलम ७४ (महिलेचं चारित्र्यहनन करणे, मारहाण करणे), कलम १२३ (विष देऊन, औषधी द्रव्यं देऊन मारण्याचा प्रयत्न करणे) अशा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. तसंच या २३ जणांपैकी १२ जणांची ओळख पटली आहे. राज विश्वकर्मा, समीर, आयुष, सोहेल, दानिश, अनमोल, साजिद, झाहीर, इम्रान, जैब, अमन आणि राज खान अशी ओळख पटलेल्या गुन्हेगारांची नावं असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी वाराणसीतल्या या घटनेबाबत काय सांगितलं?

अतिरिक्त पोलीस आयुक्त विदुष सक्सेना यांनी माध्यमांना माहिती दिली, ते म्हणाले, “१९ वर्षीय पीडिता २९ मार्च रोजी काही तरुणांसह बाहेर गेली होती. ती परत आली नाही, त्यामुळे तिच्या पालकांनी ती हरवल्याची तक्रार नोंदवली. ४ एप्रिलच्या दिवशी मुलीच्या पालकांनी ही तक्रार नोंदवली. पोलिसांनी या मुलीला सोडवलं. मात्र तिने सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती त्यावेळी दिली नाही. तिच्या कुटुंबाने ६ एप्रिल रोजी तिच्यावर २३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात केली.”

पीडितेच्या आईने तक्रारीत काय म्हटलं आहे?

वाराणसी बलात्कार पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पीडिता २९ मार्च रोजी तिच्या घरातून काही तरुणांसह बाहेर पडली. ती घरी परतत असताना तिची भेट राज विश्वकर्मा या मुलाशी झाली त्याने तिला एका कॅफेमध्ये नेलं. तिथे राज विश्वकर्मा आणि त्याच्या इतर काही मित्रांनी तिच्याशी गैरवर्तन केलं. ३० मार्च रोजी समीर नावाचा मुलगा या पीडितेला भेटला. तो त्याच्या मित्रांसह बाईकवरुन आला होता. तो माझ्या मुलीला बाईकवर हायवेला घेऊन गेला. त्यावेळी त्याने बाईकवर मुलीशी अश्लील चाळे केले. त्यानंतर समीरने माझ्या मुलीला नादेसार या ठिकाणी सोडून दिलं असं पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर ३१ मार्च रोजी आयुष त्याच्या पाच मित्रांसह आला. सोहेल, दानिश, अनमोल, साजिद आणि झाहीर यांनी माझ्या मुलीला सिगरा नावाच्या कॅफेमध्ये दिलं. तिथे तिला ड्रग्ज दिले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला अशी माहिती मुलीच्या आईने तक्रारीत दिली आहे.

१ आणि २ एप्रिल रोजी काय घडलं?

पीडितेच्या आईने पुढे म्हटलं आहे की १ एप्रिल रोजी साजिद आणि त्याच्या मित्राने मुलीला हॉटेलमध्ये नेलं तिथे दोन ते तीन जण आधीच हजर होते. त्यावेळीही तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि तिला हॉटेलबाहेर फेकण्यात आलं. यानंतर या मुलीला इम्रान भेटला. त्यानेही तिला हॉटेलवर नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलगी पूर्णवेळ ड्रग्जच्या अंमलाखाली होती त्यामुळे काय घडतंय तिला नीटसं कळत नव्हतं. इम्रानने तिच्यावर बलात्कार केला तेव्हा काहीतरी चुकीचं घडतंय हे कळून ती ओरडली. तेव्हा इम्रानने तिला हॉटेलबाहेर सोडून दिलं. यानंतर २ एप्रिलला राज खान मुलीला त्याच्या हुकुलगंज येथील घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिला पुन्हा ड्रग्ज दिले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तीने आरडाओरडा केला तेव्हा त्यावेळी अस्सी घाट या ठिकाणी तिला नशेच्या अवस्थेतच सोडण्यात आलं. यानंतर ३ एप्रिलला दानिश नावाच्या एका मुलाने मुलीला त्याचा मित्र सोहेलच्या खोलीवर नेलं. तिथे सोहेल, शोएब आणि अजून एक जण होता. त्यांनी पुन्हा तिला ड्रग्ज दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा चौकघाट भागात सोडून देण्यात आलं. यानंतर ४ एप्रिल रोजी या पीडितेची पोलिसांनी सुटका केली. अशी माहिती पीडितेच्या आईने दिली. दरम्यान या घटनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कठोरातली कठोर कारवाई कऱण्याचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की या प्रकरणी आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करा. तसंच उत्तर प्रदेश सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून कठोरातल्या कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.