Crime News : १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एका ४५ वर्षीय माणसाशी लग्न करण्याची सक्ती तिच्या वडिलांनीच केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे लग्न १५ वर्षांच्या मुलीच्या आईच्या संमतीशिवाय, तिच्या मर्जीशिवाय पार पडलं. या लग्नाला मुलीच्या आईनेही विरोध केला होता पण वडिलांनी तिलाही धमकावलं आणि हे लग्न लावून दिलं.
कुठे घडली ही घटना?
१५ वर्षांच्या मुलीचं लग्न ४५ वर्षीय माणसाशी बळजबरीने लावून देण्याची ही घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील गोरामाडुगू गावात ही घटना घडली आहे. नारायण स्वामीच्या दुसऱ्या पत्नीची ही मुलगी आहे. त्याने त्या मुलीचं आणि तिच्या आईचं म्हणजेच त्याच्या पत्नीचं काहीही ऐकून घेतलं नाही आणि बळजबरीने या मुलीचं लग्न लावून दिलं. या लग्नाबाबत कुणालाही काहीही माहिती देण्यात आली नाही. या प्रकरणात आता पोलीस पुढील तपास करत आहेत. तसंच या प्रकरणात मुलीच्या वडिलांशिवाय आणखी कुणाचा सहभाग आहे? याचाही शोध पोलीस घेत आहेत. तसंच वडिलांनी नेमकं हे का केलं? याचाही तपास पोलीस घेत आहेत.
पोलिसांना याबाबाबत कसं काय समजलं?
नीती आयोग आणि असोसिएशन फॉर व्हॉलंटरी अॅक्शन यांना या लग्नाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कळवलं. या दोन्ही संस्थांनी १५ हजार गावांमध्ये बालविवाह होऊ नयेत म्हणून जनजागृती केली आहे. तसंच मुलांना, मुलींना शिकवा आणि त्यांच्या पायावर उभं करा हे सांगत या दोन्ही संस्था कार्यरत आहेत. टाइम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे. देशातल्या अनेक गावांमध्ये कमी वयातच मुलींचं लग्न लावून दिलं जातं. तिला अजूनही दुसऱ्या घरात जाणारी म्हणून उपेक्षेने वागवलं जातं. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून या दोन्ही संस्था कार्यरत आहेत.